टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला लवकरच नारळ दिला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. खरंच त्याची उचलबांगडी होणार का या संदर्भात अधिकृत अशी माहिती आलेली नाही. इनसायडर स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार ही माहिती समोर येत आहे. खरं तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या मुंबईतील मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड भारताच्या टी२० सेटअपसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नियुक्त करण्याचा ‘गांभीर्याने विचार’ करत आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय टी२० संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीमध्येच जाहीर केला जाऊ शकतो. याचा अर्थ भारत नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. माध्यमातील चर्चांमध्ये हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताचा नवा टी२० कर्णधार म्हणून अधिकृतपणे नियुक्त केले जाईल अशा बातम्या समोर येत होत्या. आता बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला पुष्टी केली आहे की बोर्ड भारतीय टी२० संघासाठी नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्यात देखील इच्छुक आहे. सर्व शक्यतांमध्ये, नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत जवळून काम करेल.
या अंतर्गत द्रविड प्रामुख्याने एकदिवसीय आणि कसोटी संघावर लक्ष केंद्रित करेल, तर टी२० साठी स्वतंत्र कोचिंग सेट अप करण्याचा विचार केला जात आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही पुष्टी केली, “आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविड किंवा कोणाच्याही क्षमतेपेक्षा व्यस्त वेळापत्रक सांभाळणे आणि बोर्डात तज्ञ कौशल्ये असणे हा प्रश्न आहे. टी२० हा आता वेगळा खेळ, कठीण कॅलेंडर आणि नियमित कार्यक्रमांसारखा आहे. आपल्यालाही बदल स्वीकारण्याची गरज आहे. होय, मी पुष्टी करू शकतो – भारतात लवकरच नवीन टी२० कोचिंग सेटअप होईल.”
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला पुढे विचारले की नवीन नियुक्ती कधी होऊ शकते. भारताचे नवे टी२० प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाऊ शकते? याला उत्तर देताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, “आतापर्यंत कोणालाही वगळले नाही. ही सर्व प्रक्रिया कधी पर्यंत होईल याची माहिती अद्याप माहिती आम्ही देऊ शकत नाही. पण आम्हाला खात्री आहे की भारताला टी२० सेटअपसाठी नवीन दृष्टीकोन आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीपूर्वी नवीन कर्णधाराची घोषणा होऊ शकते आणि आणखी नवीन प्रशिक्षक येऊ शकतात, पण मी म्हटल्याप्रमाणे काहीही अंतिम नाही.” असे तो अधिकारी शेवटी म्हणाला.