भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून ओळखले आहे. देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद (मोटेरा) येथे आहे. आता बीसीसीआयने भविष्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआय बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (NCA) भव्य स्वरूप देणार आहे. सोमवारी अकादमीची पायाभरणी झाली. यावेळी अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि एनसीएचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. यानंतर गांगुली आणि जय शाह यांनी याबाबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अकादमीमध्ये तीन मोठी मैदाने बांधण्यात येणार आहेत. एकामध्ये फ्लड लाईटचीही सोय आहे. म्हणजेच रात्रीही खेळाडूंना सराव करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४० हून अधिक सराव खेळपट्ट्यांसह, जिमसह सर्व आधुनिक सुविधा येथे असतील. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए प्रमुख आहे. सर्व ज्युनियर खेळाडू येथे तयारीसाठी येतात. याशिवाय वरिष्ठ खेळाडूही दुखापत झाल्यास रिहॅबसाठी येथे येतात.
हेही वाचा – IPL ऑक्शन बघता बघता झोपला; जाग आली तेव्हा मिळाली करोडपती झाल्याची बातमी!
नुकताच भारतीय अंडर-१९ संघाने वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघ विक्रमी पाचव्यांदा चॅम्पियन बनला. मात्र याआधीही अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकले नाहीत. अशा स्थितीत या खेळाडूंवर लक्ष ठेवण्यासाठी बोर्ड एक विशेष गट तयार करणार असून, त्यांच्यावर सर्वांची नजर राहणार आहे. यामुळे ज्युनियर खेळाडूंना तयारीसह पुढे जाण्याची संधी मिळेल.