नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आशिया चषकासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) ‘संमिश्र प्रारूपा’ला मान्यता देण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार, भारताव्यतिरिक्त अन्य देशांचे आशिया चषकातील काही सामने पाकिस्तानात, तर उर्वरित सामने श्रीलंकेतील गॉल आणि पालेकेले येथे आयोजित करण्यात येतील.
‘एसीसी’ यासंदर्भात मंगळवारी औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे. या प्रारूपाला मान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यास तयारी दर्शवेल असे अपेक्षित आहे. तसेच पाकिस्तान संघाची अहमदाबाद येथे सामने खेळण्यासही हरकत नसेल.
‘‘ओमान क्रिकेट मंडळाचे प्रमुख आणि ‘एसीसी’ कार्यकारी मंडळाचे सदस्य पंकज खिमजी यांना तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली होती. बहुतांश सदस्यांना ‘संमिश्र प्रारूप’चा प्रस्ताव मान्य नव्हता. मात्र, आता त्यांची भूमिका बदलली आहे. सध्याच्या माहितीनुसार पाकिस्तान वि. नेपाळ, बांगलादेश वि. अफगाणिस्तान, अफगाणिस्तान वि. श्रीलंका आणि श्रीलंका वि. बांगलादेश हे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामने, तसेच ‘अव्वल चार’ फेरीचे सर्व सामने पालेकेले किंवा गॉलमध्ये होतील,’’ असे ‘एसीसी’ मंडळातील एका सदस्याने सांगितले.
आशिया चषकाचे आयोजन सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील चार सामन्यांचे आयोजन पाकिस्तानात झाल्यास, पाकिस्तान मंडळ विश्वचषकात सहभाग नोंदवण्यासाठी कोणत्याच अटी ठेवणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अॅलडाईस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी ‘पीसीबी’चे अध्यक्ष नजम सेठी यांची भेट घेतली होती. त्यांच्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
विश्वचषकाची कार्यक्रमपत्रिका या आठवडय़ात जाहीर?
पाकिस्तानशिवाय आशिया चषक स्पर्धा खेळल्यास प्रसारणकर्ते स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेच्या अर्धीच रक्कम देतील. याचे कारण म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन निश्चित साखळी सामने व दोन्ही संघ अंतिम फेरी गाठण्याची शक्यता पाहता तिसरा सामनाही होणार नाही. त्यामुळे ‘संमिश्र प्रारूपा’चा ‘पीसीबी’चा प्रस्ताव मान्य करणे हाच योग्य तोडगा समजला जात आहे. त्यांचा प्रस्ताव मान्य केल्याने पाकिस्तानचा संघ कुठलीही अट न ठेवता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवेल. एकदिवसीय विश्वचषकाची कार्यक्रमपत्रिका या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाचा सामना अहमदाबाद येथे होऊ शकतो. तर, पाकिस्तानचे उर्वरित सामने चेन्नई व हैदराबाद येथे होऊ शकतात.