भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय करुण नायर आणि मुरली विजय या दोन खेळाडूंची चौकशी करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही खेळाडूंनी निवड समितीच्या संघनिवड प्रक्रीयेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. दोन्ही खेळाडूंना संघात जागा मिळाली नसल्याने, आम्हाला निवड समितीकडून कोणत्याही गोष्टीची कल्पना मिळाली नसल्याचं दोन्ही खेळाडूंनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बीसीसीआय चांगलचं नाराज असल्याचं समजत आहे.
अवश्य वाचा – बायकोला सोबत राहू द्या ना! विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती
“विजय आणि करुण नायर यांनी संघ निवडीच्या प्रक्रियेबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य करुन चुकीची गोष्ट केली आहे. त्यांची ही वक्तव्य बीसीसीआयच्या कराराचं उल्लंघन करणारी आहेत. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला संघ निवडीबाबत ठराविक वेळेपर्यंत प्रसारमाध्यमांमध्ये बोलण्याची मूभा नसते. ११ ऑक्टोबररोजी क्रिकेट प्रशासकीय समितीची हैदराबाद येथे बैठक पार पडणार आहे, या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.” बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली आहे.
नुकतच विजय आणि करुण नायर यांनी निवड समितीकडून होणाऱ्या खेळाडूंना निवडीबद्दल माहिती मिळत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. निवड समितीच प्रत्येक बाबी योग्य पद्धतीने खेळाडू व प्रसारमाध्यमांसमोर आणते आहे. त्यांचं कामही स्वतंत्रपणे चालतं. मुरली विजय आणि करुण नायर या दोघांच्या संघातील समावेशाबद्दलचा निर्णयही निवड समितीने त्यांच्या जबाबदारीवर घेतला आहे.” विनोद राय यांनी पीटीआयला माहिती दिली. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंबद्दल बीसीसीआय काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.