भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यातील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कर्णधार महेंद्रसिंह धोनी व प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे.
गेले तीन वर्षे परदेशातील सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी खराब होत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांपुढील चिंतेत वाढ झाली आहे. मात्र धोनी व फ्लेचर यांना त्यांच्या पदावरून दूर केले जाण्याची शक्यता कमी आहे. भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय व कसोटी मालिका गमावली. याबाबत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आम्ही भारतीय संघाच्या पराभवाचा आढावा घेणार आहोत. याबाबत आम्ही धोनी व फ्लेचर यांच्याकडून नेमकी कारणे माहीत करून घेणार आहोत. संघाच्या कामगिरीत सुधारणा करून घेण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.’’
धोनी व फ्लेचर यांच्यावर टीका होत असली तरी त्यांना तूर्तास संघापासून दूर करण्याबाबत बीसीसीआय उत्सुक नाही. या दोघांच्या कामगिरीवर मंडळाचा विश्वास आहे. ही जोडी २०११मध्ये एकत्र आली. त्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला, तर ऑस्ट्रेलियाकडूनही त्यांची तीच स्थिती झाली. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत त्यांना ०-१ अशी हार पत्करावी लागली. फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने १५ सामने खेळले असून त्यापैकी दहा सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला. २०११पासून धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशातील १४ कसोटींपैकी नऊ कसोटी सामने गमावले आहेत.
दरम्यान, फ्लेचर यांच्याशी केलेल्या कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वेचे ज्येष्ठ खेळाडू व प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते. मात्र त्या वृत्ताचा मंडळाच्या पदाधिकाऱ्याने इन्कार केला आहे.
परदेशातील खराब कामगिरीबाबत सौरव गांगुली, राहुल द्रविड या माजी कर्णधारांसह अनेक माजी खेळाडूंनी धोनी व फ्लेचर यांच्या कार्यपद्धतीबाबत टीका केली आहे. धोनी व फ्लेचर यांच्या खराब कामगिरीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा ढासळत आहे, अशी टीका गांगुली व द्रविड यांनी केली आहे. गांगुली याने म्हटले आहे की, ‘‘धोनीला नेतृत्वाबाबत फ्लेचर यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे. धोनी व फ्लेचर यांनी योग्य रीतीने नियोजन व व्यूहरचना केली पाहिजे. निवड समितीने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे.’’
भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक जो डेव्स यांच्यावरही गांगुलीने टीका केली आहे. ते म्हणाले की ‘‘द. आफ्रिकेचे प्रशिक्षक अ‍ॅलन डोनाल्ड हे सामना सुरू असताना सीमारेषेजवळ जाऊन खेळाडूंना मार्गदर्शन करीत असतात. तसे डावपेच आपल्या प्रशिक्षकांकडून कधीही दिसलेले नाहीत.’’
द्रविडने धोनीच्या नेतृत्वशैलीत बचावात्मक वृत्ती दिसून येत असल्याची टीका केली. तो म्हणाला, ‘‘परदेशातील मैदानांवर कसोटी सामने जिंकण्यासाठी थोडासा धोका पत्करण्याची आवश्यकता असते व तसेच आक्रमक धोरण स्वीकारण्याचीही गरज असते.’’

फ्लॉवरशी कोणतीही चर्चा झाली नाही; बीसीसीआयकडून स्पष्टीकरण
मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दौऱ्यावरील खराब कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती होणार अशी चर्चा होती. या संदर्भात बीसीसीआय फ्लॉवर यांच्याशी बोलणी झाल्याचेही वृत्त होते. परंतु या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे. ‘‘ते वृत्त खोडसाळ आहे. फ्लॉवर यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. झिम्बाब्वेचे माजी कर्णधार फ्लॉवर यांना भारताच्या प्रशिक्षकपदासाठी आणण्यात येणार असल्याचे चर्चेत होते.

आयपीएलच्या यजमानपदासाठी बीसीसीआयची अन्य क्रिकेट मंडळांशी चर्चा
नवी दिल्ली : आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था पुरवू शकणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यावर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पध्रेच्या यजमानपदासाठी अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी बोलणी सुरू केली आहे. ‘‘मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने आयपीएल स्पध्रेला पुरेशी सुरक्षा व्यवस्था देऊ शकणार नाही, असे सांगितले आहे. या पाश्र्वभूमीवर स्पध्रेच्या आयोजनासाठी आम्ही अन्य मंडळांशी चर्चा सुरू केली आहे,’’ असे आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण आफ्रिकेला आयपीएल स्पध्रेसाठी प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ.’’ आयपीएलचे सातवे पर्व ९ एप्रिल ते ३ जून या कालावधीत रंगणार असून, याच काळात देशभरात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आयपीएल स्पध्रेला पुरेशी सुरक्षाव्यवस्था देऊ शकणार नाही, असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. अन्य देशात आयपीएल स्पर्धा होण्यापूर्वी सरकारच्या सर्व अटींची पूर्तता करू, असे बिस्वाल यांनी सांगितले.

Story img Loader