भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यातील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कर्णधार महेंद्रसिंह धोनी व प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे.
गेले तीन वर्षे परदेशातील सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी खराब होत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांपुढील चिंतेत वाढ झाली आहे. मात्र धोनी व फ्लेचर यांना त्यांच्या पदावरून दूर केले जाण्याची शक्यता कमी आहे. भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय व कसोटी मालिका गमावली. याबाबत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आम्ही भारतीय संघाच्या पराभवाचा आढावा घेणार आहोत. याबाबत आम्ही धोनी व फ्लेचर यांच्याकडून नेमकी कारणे माहीत करून घेणार आहोत. संघाच्या कामगिरीत सुधारणा करून घेण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.’’
धोनी व फ्लेचर यांच्यावर टीका होत असली तरी त्यांना तूर्तास संघापासून दूर करण्याबाबत बीसीसीआय उत्सुक नाही. या दोघांच्या कामगिरीवर मंडळाचा विश्वास आहे. ही जोडी २०११मध्ये एकत्र आली. त्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला, तर ऑस्ट्रेलियाकडूनही त्यांची तीच स्थिती झाली. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत त्यांना ०-१ अशी हार पत्करावी लागली. फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने १५ सामने खेळले असून त्यापैकी दहा सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला. २०११पासून धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशातील १४ कसोटींपैकी नऊ कसोटी सामने गमावले आहेत.
दरम्यान, फ्लेचर यांच्याशी केलेल्या कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वेचे ज्येष्ठ खेळाडू व प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते. मात्र त्या वृत्ताचा मंडळाच्या पदाधिकाऱ्याने इन्कार केला आहे.
परदेशातील खराब कामगिरीबाबत सौरव गांगुली, राहुल द्रविड या माजी कर्णधारांसह अनेक माजी खेळाडूंनी धोनी व फ्लेचर यांच्या कार्यपद्धतीबाबत टीका केली आहे. धोनी व फ्लेचर यांच्या खराब कामगिरीमुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा ढासळत आहे, अशी टीका गांगुली व द्रविड यांनी केली आहे. गांगुली याने म्हटले आहे की, ‘‘धोनीला नेतृत्वाबाबत फ्लेचर यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे. धोनी व फ्लेचर यांनी योग्य रीतीने नियोजन व व्यूहरचना केली पाहिजे. निवड समितीने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे.’’
भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक जो डेव्स यांच्यावरही गांगुलीने टीका केली आहे. ते म्हणाले की ‘‘द. आफ्रिकेचे प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड हे सामना सुरू असताना सीमारेषेजवळ जाऊन खेळाडूंना मार्गदर्शन करीत असतात. तसे डावपेच आपल्या प्रशिक्षकांकडून कधीही दिसलेले नाहीत.’’
द्रविडने धोनीच्या नेतृत्वशैलीत बचावात्मक वृत्ती दिसून येत असल्याची टीका केली. तो म्हणाला, ‘‘परदेशातील मैदानांवर कसोटी सामने जिंकण्यासाठी थोडासा धोका पत्करण्याची आवश्यकता असते व तसेच आक्रमक धोरण स्वीकारण्याचीही गरज असते.’’
परदेश दौऱ्यातील कामगिरीचा बीसीसीआय आढावा घेणार?
भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यातील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कर्णधार महेंद्रसिंह धोनी व प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2014 at 04:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci likely to take stock of team indias overseas performance