बंगळुरूजवळ क्रिकेट अकादमीसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) एका  जमीन सौद्यामुळे तब्बल ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या उपसमितीच्या बैठकीत या घोटाळ्याचा सूत्रधार असणाऱ्या व्यक्तीची सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली.
हा व्यक्ती बीसीसीआयचा कर्मचारी नाही किंवा संलग्न राज्य क्रिकेट संघटनेचा कर्मचारी नाही, मात्र त्याने बीसीसीआयतर्फे कर्नाटक औद्योगिक विकास प्राधिकरण मंडळाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ४९ एकर जमिनीसंदर्भात कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. बंगळुरूच्या विमानतळानजीकच हा भूखंड आहे. २०१०मध्ये झालेल्या सौद्यासाठी बीसीसीआयने ४६.१३५ कोटी रुपये दिले होते, असे सूत्रांकडून समजते.
याआधी २००८मध्ये बंगळुरूच्या सीमेनजीक बिदाडी येथील ३२ एकरचा भूखंड एनसीएच्या योजनांसाठी कर्नाटक सरकारने बीसीसीआयला ३.८४१ कोटी रुपयांना दिला होता. परंतु ही जागा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दूर असल्यामुळे आणि अन्य काही गोष्टींमुळे हा सौदा संपुष्टात आला होता.
आता बीसीसीआयकडून या भूखंडासंदर्भात अंदाजे ५० कोटी रुपये (४९,९७,६०,०००) देणे होते. या प्रकरणाच्या सूत्रधाराचा छडा लागत नसून, आता एनसीएचे अधिकारी ‘रडार’वर आहेत.

Story img Loader