भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडून गांगुली आणि द्रविड यांच्याबाबत केलेल्या टिप्पण्यांवर उत्तर मागू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने साहाने प्रशिक्षक द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर जोरदार टीका केली होती. तो म्हणाला होता, की गांगुलीने त्याला संघातून वगळले जाणार नाही असे वचन दिले होते. त्याचवेळी द्रविडने त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. द्रविड आणि गांगुली यांना टार्गेट करून साहाने बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे.
साहाकडे बीसीसीआय ग्रुप बी करार आहे. या आधारे त्यांना वर्षाला ३ कोटी रुपये मिळतात. साहाने त्याचे प्रशिक्षक आणि बोर्ड अध्यक्षांविरुद्ध टिप्पणी करून कलम ६.३चे उल्लंघन केले आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, खेळाडू मीडियामध्ये खेळ, अधिकारी, सामन्यादरम्यान घडलेली कोणतीही घटना, तंत्रज्ञानाचा वापर, खेळाडूंची निवड किंवा बीसीसीआयच्या विरोधात किंवा क्रिकेट खेळाला विरोध करणारी कोणतीही बाब मीडियामध्ये भाष्य करू शकत नाही. हो. साहाने मीडियामध्ये प्रशिक्षक द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि बोर्ड अध्यक्ष गांगुली यांच्या विरोधात टीका केली आहे.
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयला सांगितले, ”बीसीसीआय साहाला केंद्रीय करारबद्ध खेळाडू असूनही त्याने निवड प्रकरणावर कशी टिप्पणी केली हे विचारण्याची शक्यता आहे. गांगुलीचा विचार करता, त्याने साहाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत बीसीसीआय साहाला विचारू शकते की त्याने ड्रेसिंग रूममधील खासगी संभाषणे सार्वजनिक का केली? याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून, येत्या काळात याबाबत निर्णय घेतला जाईल.”
हेही वाचा – हिटमॅनसाठी खुशखबर..! IPLपूर्वी रोहित शर्माचा होणार सन्मान; MCAनं घेतला निर्णय!
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर साहा सातत्याने वादात सापडला आहे. आधी त्याने द्रविड आणि गांगुली यांच्या विरोधात वक्तव्य केले. यानंतर एका पत्रकाराने त्याला मुलाखतीसाठी विचारले. साहाने प्रतिसाद न दिल्याने पत्रकाराने त्याची कधीही मुलाखत न घेण्याची धमकी दिली होती. यानंतर साहाने या चॅटचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले.