BCCI Media Rights: टीम इंडिया आशिया कप २०२३ नंतर वर्ल्डकप २०२३ मध्ये भाग घेणार आहे. यानंतर २०२८ पर्यंत संघ वेगवगळ्या मालिकेत खूप व्यस्त असेल. टीम इंडियामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला खूप फायदा होणार आहे. पाच वर्षांच्या नव्या चक्रात टीम इंडिया घरच्या मैदानावर म्हणजेच मायदेशात जवळपास ८८ सामने खेळणार आहे. टीव्ही आणि डिजिटल अधिकारांमुळे बीसीसीआय सुमारे एक अब्ज डॉलर्स कमवू शकते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील ५ वर्षात भारतात होणाऱ्या सामन्यांचे मीडिया अधिकार संपादन करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. बीसीसीआयला यापेक्षा मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. मीडिया अधिकारांच्या लिलावाची रक्कम एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते जी सुमारे ८२०० कोटी रुपये आहे. २०२८ पर्यंत ८८ देशांतर्गत सामन्यांसाठी या हक्कांचा लिलाव होणार आहे.

टीम इंडियाच्या ८८ देशांतर्गत मॅचेसचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार स्वतंत्रपणे विकून बीसीसीआय सुमारे ८२०० कोटी रुपयांचा आकडा पार करू शकते. नवीन चक्रामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ घरगुती सामने (५ कसोटी, ६ एकदिवसीय आणि १० टी२०) आणि इंग्लंडविरुद्ध १८ सामने (१० कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी२०) आहेत. भारताला एकूण २५ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ३६ टी२० सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा: IND vs WI 2nd T20: टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या संतापला; म्हणाला, “फलंदाजांनी जर खेळपट्टीचा…”

गेल्या पाच वर्षांच्या चक्रात (२०१८ ते २०२३), BCCI ला स्टार इंडियाकडून $९४४ दशलक्ष (सुमारे ६१३८ कोटी रुपये) मिळाले आहेत, ज्यात प्रति सामना (डिजिटल आणि टीव्ही) ६० कोटी रुपये समाविष्ट आहेत. यावेळी बीसीसीआय डिजिटल आणि टीव्ही हक्कांसाठी स्वतंत्र बोली मागवणार आहे. आयपीएल दरम्यान मीडिया अधिकारांमधून ४८,३९० कोटी रुपये कमावले, ज्यामध्ये डिजिटल अधिकार रिलायन्सने आणि टीव्ही अधिकार स्टार टीव्हीने विकत घेतले. लिलाव प्रक्रिया आयपीएलप्रमाणे ई-लिलावाद्वारे पूर्ण केली जाईल.

भारताच्या देशांतर्गत सामन्यांसाठी डिस्ने-स्टार, रिलायन्स-व्हायकॉम हे प्रमुख दावेदार असतील. तीन महिन्यांनी विश्वचषक होणार असून जर भारत जिंकू शकला नाही तर जाहिरातींच्या कमाईवर परिणाम होणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, एका प्रसारकाने सांगितले की, “या चक्रामध्ये २५ देशांतर्गत कसोटी सामने होणार आहेत. आधीचे कसोटी सामन्यांचे निकाल पाहता पाचव्या दिवसापर्यंत किती कसोटी गेल्या आहेत हे पाहणे देखील महत्वाचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक तीन दिवसात संपले आहेत, त्यामुळे या एका पैलूवर विचार मंथन सुरु आहे.”

बीसीसीआयकडून ई-लिलाव आयोजित केला जाईल. याआधी २०१८ मध्ये मीडिया हक्कांचा लिलाव झाला होता, त्यावेळी तो ऑफलाइन आयोजित करण्यात आला होता. यावेळी टीव्ही आणि डिजिटलसाठी स्वतंत्र हक्क दिले जाणार आहेत. तर यापूर्वी दोघांचे हक्क स्टारकडे होते.

हेही वाचा: ICC WC 2023: संघ जाहीर करण्यात ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी; विश्वचषकासाठी केला संघ जाहीर, कमिन्स-हेझलवुडचे पुनरागमन

भारतीय संघ पुढील मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे

टीम इंडिया त्यांच्या आगामी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या स्वरूपात पुढील मालिका खेळणार आहे. त्याच वेळी, स्टार इंडिया व्यतिरिक्त, जिओ सिनेमासह अनेक मोठ्या कंपन्या नवीन मीडिया हक्कांच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. आता टीव्ही आणि डिजिटलसाठी या सामन्यांचे मीडिया अधिकार मिळवण्यात कोणती कंपनी बाजी मारते हे पाहणे मनोरंजक असेल. यापूर्वी, बीसीसीआयने गेल्या वर्षी आयपीएलसाठी मीडिया हक्कांचा लिलाव केला तेव्हा ते ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेले होते. यामध्ये स्टार इंडियाने २३,५७५ कोटी रुपयांना टीव्हीचे प्रसारण हक्क विकत घेतले. तर Viacom 18ने २०,५०० कोटी रुपयांना डिजिटल अधिकार विकत घेतले.

Story img Loader