एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) महत्त्वाची कार्यकारिणी समितीची बैठक नाटय़मयरीत्या तहकूब करण्यात आली. पायउतार झालेल्या बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांबाबत कायदेशीर स्पष्टता न झाल्यामुळे विद्यमान अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी ही बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
‘‘एन. श्रीनिवासन बीसीसीआयच्या बैठकीला तामिळनाडूचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून हजर राहू शकतात का, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत घेतले जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची कार्यकारिणी समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर. एम. लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घातली. त्यानंतर या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आणि आयपीएल सावरण्यासाठी कार्यकारिणी समितीने चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. हाच विषय शुक्रवारी कार्यकारिणीच्या बैठकीत ऐरणीवर होता. मात्र श्रीनिवासन यांच्या उपस्थितीबाबत काही सदस्यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे ही बैठक थांबवण्यात आली. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता.
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने मी बीसीसीआयच्या बैठकीला हजर राहू शकतो, असा न्या. श्री कृष्णा यांचा हवाला या वेळी श्रीनिवासन यांनी दिला. मात्र तरीही काही सदस्यांनी श्रीनिवासन यांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला. बीसीसीआयच्या बैठकांपासून श्रीनिवासन यांनी दूर राहावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘बीसीसीआयचे कायदेशीर सल्लागार उषनाथ बॅनर्जीसुद्धा श्रीनिवासन यांच्या संदर्भातील कायदेशीर भूमिकेबाबत साशंक असल्यामुळे अध्यक्षांनी बीसीसीआयची बैठक तहकूब केली,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी श्रीनिवासन यांना या बैठकीला हजर राहू नये, असे आधीच सांगितले होते. परंतु त्यांनी कुणाचेही ऐकले नाही.
बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तातडीची कार्यकारिणी समितीची बैठक होईल आणि याच बैठकीत वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित होईल. ही बैठक २७ सप्टेंबरला कोलकाताला होण्याची शक्यता आहे.
भारताच्या नव्या प्रशिक्षकाची निवड हा विषय या बैठकीत चर्चेला येणार नव्हता. कारण कार्यकारिणी समितीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीला कार्यकारिणीने नाव निश्चित करण्यास सांगितले आहे.
गुरुवारी आयपीएल प्रशासकीय समितीच्या झालेल्या बैठकीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्या जागी पुढील दोन हंगामांसाठी दोन नवे संघ खेळवण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा