आयपीएलच्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर साऱ्यांचेच लक्ष आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आगामी वार्षिक बैठकीकडे लागलेले आहे. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक ८ फेब्रुवारीला होणार असून, यामध्येच वार्षिक बैठकीची तारीख ठरवण्यात येणार आहे. या बैठकीनंतर एन. श्रीनिवासन यांचे पुढचे पाऊल नेमके काय असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
कार्यकारिणी समिती सदस्य ७ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये बैठकीसाठी पोहोचणार असून, यापूर्वी समितीमधील काही सदस्यांची भेट एन. श्रीनिवासन घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वीच एन. श्रनिवासन आणि त्यांच्या सहकाऱ्यांची रणनीती ठरणार आहे.
‘‘बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीबाबतचे पत्र आम्हाला मिळाले आहे. या समितीचे सदस्य अनौपचारिकपणे ५ फेब्रुवारीला एकत्र भेटणार आहेत, त्यावेळीच एन. श्रीनिवासन समिती सदस्यांची भेट घेऊन पुढील रणनीती आखणार आहेत,’’ असे बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीमधील एका सदस्याने सांगितले.
२२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एन. श्रीनिवासन यांना हितसंबंधांमुळे बीसीसीआयची निवडणूक लढवता येणार नाही. पण जर त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी सोडल्यास त्यांना निवडणूक लढवता येऊ शकते, त्यामुळे श्रीनिवासन चेन्नई संघाची मालकी सोडतील, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा