देवेंद्र पांडे – इंडियन एक्सप्रेस
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामुळे बीसीसीआय प्रचंड नाराज आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली ज्यामध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यावरही चर्चा झाली. या पराभवाची जबाबदारी खेळाडूंनी घ्यावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे आणि त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बोर्डाने निर्णय घेतला आहे की आता संघाच्या पराभवाचा परिणाम खेळाडूंच्या खिशावरही होणार आहे. खेळाडूला त्यांच्या कामगिरीची आणि पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. जर एखाद्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्यांच्या पगारात कपात केली जाईल. यामुळे खेळाडू अधिक जबाबदारीने खेळतील, असं बोर्डाचं म्हणणं आहे.
गेल्या वर्षी मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ०-३ असा पराभव पत्ककारावा लागला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियातही भारताने मालिका १-३ ने गमावली. या मालिकेत संघाचे अनेक स्टार फलंदाज धावा करू शकले नाहीत.
रिपोर्टनुसार, खेळाडू हे खेळताना विशेषत: लाल चेंडूचे क्रिकेट खेळताना अधिक जबाबदारीने खेळतील यासाठी हा विचार करण्यात आला. जेणेकरून ते संघातील आपली भूमिका अधिक जबाबदारीने पार पाडू शकतील. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांचा हवाला देत लिहिले की हा निर्णय यासाठी घेण्यात येत आहे की ज्यामुळे खेळाडू अधिक जबाबदारीन खेळतील. जर ते त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले तर त्यांना मिळणारा पगारही कमी असेल.
गतवर्षी इन्सेंटिव्ह देण्याचा घेतला होता निर्णय
गेल्या वर्षी बीसीसीआयने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने वर्षभरात कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हंगामातील ५० टक्क्यांहून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी ३० लाख रुपयांचे इन्सेंटिव्ह दिले जाईल.
त्याचप्रमाणे ७५ टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी ४५ लाख रुपये दिले जातील. पैशांमुळे टी-२० लीगकडे आकर्षित झालेल्या युवा खेळाडूंनाही कसोटीचे महत्त्व कळावे, असा त्यांचा प्रयत्न होता.
कसोटी सामने खेळण्याची खेळाडूंची इच्छाशक्ती कमी होत असल्याची चर्चा बीसीसीआयच्या बैठकीत झाली. खेळाडू कसोटीऐवजी लीग क्रिकेट खेळण्याला महत्त्व देऊ लागले आहेत, जे क्रिकेट बोर्डाला व्हायला नको आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी बोर्डाला मोठे निर्णय घ्यावे लागतील.