Chetan Sharma to Continue as Chairman of Selection Panel: मागील जवळपास दीड महिन्यांपासून भारतीय क्रिकेट पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीची सर्वांना प्रतीक्षा होती. मागील निवड समितीच्या बरखास्तीनंतर निवड समितीत कोण बसणार याविषयी उत्सुकता ताणली गेलेली. शनिवारी (७ जानेवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन निवडसमिती जाहीर केली. विशेष म्हणजे मागील बरखास्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष असलेले चेतन शर्मा (Chetan Sharma) हेच नव्या निवड समितीचेही अध्यक्ष असणार आहेत. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाला. यानंतर बीसीसीआयने (बीसीसीआय) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली होती. आता बीसीसीआयने नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्माला पुन्हा एकदा मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. यापूर्वी ते निवड समितीचे मुख्य निवडकर्ता होते. मात्र त्यांच्याशिवाय चारही नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे.
यांना मिळाली निवड समितीमध्ये जागा
चेतन शर्मासह शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांना निवड समितीमध्ये स्थान मिळाले आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यांची निवड केली. BCCI ने १८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडकर्ता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी मंडळाकडे खूप अर्ज आले.
बीसीसीआयला निवडकर्ता पदासाठी ६०० हून अधिक लोकांकडून अर्ज आले होते. निवड समितीची निवड क्रिकेट सल्लागार समिती करते. चेतन शर्मा पुन्हा एकदा निवड समितीचे अध्यक्ष असतील, अशी माहिती बीसीसीआयने दिली. सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे, त्यानंतर एकदिवसीय मालिकाही होणार आहे. नव्या निवड समितीसमोर आता न्यूझीलंड मालिकेसाठी संघ निवडीचे आव्हान असणार आहे. तसेच टी२० फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार बनवायचा की नाही हा सर्वात मोठा निर्णय असेल. या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे, अशा परिस्थितीत नव्या निवड समितीला आत्तापासूनच रोडमॅप तयार करावा लागणार आहे.
चार खेळाडूंनी कसोटी खेळली आहे
चेतन शर्माने भारताकडून २३ कसोटी आणि ६५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. माजी सलामीवीर शिव सुंदर दासने भारतासाठी २३ कसोटी आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताकडून खेळणारा तो ओडिशाचा फक्त तिसरा खेळाडू होता. पाटण्यात जन्मलेले सुब्रतो बॅनर्जी यांनी भारतासाठी एक कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९९२ मध्ये तो टीम इंडियाचा भाग होता. माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोलाने भारतासाठी केवळ एकच कसोटी खेळली आहे. सचिनसह त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले. त्यांनी मुंबई संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहिले आहे.
श्रीधरन यांना आंतरराष्ट्रीय अनुभव नाही
तामिळनाडूचा माजी क्रिकेटपटू श्रीधरन शरथला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. मात्र त्याने १३९ प्रथम श्रेणी आणि ११६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यासोबतच त्याने मॅच रेफ्रीचीही भूमिका बजावली आहे. शरत राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीचा मुख्य निवडकर्ता देखील आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडण्याचे पहिले काम निवड समितीसमोर असेल. यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीही खेळायची आहे. या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषकही आहे.