Increase the prize money: भारतीय क्रिकेट कात टाकत आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग आणि महिला प्रीमिअर लीगमध्ये देखील मोठे बदल केले होते. आता बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. या मोसमातून रणजी करंडक विजेत्याला आता २ ऐवजी ५ कोटी रुपये मिळतील. याचा सर्वाधिक फायदा महिला क्रिकेटच्या स्पर्धांना झाला आहे. महिला एकदिवसीय ट्रॉफीच्या विजेत्याला आता सहाऐवजी ५० लाख रुपये आणि टी२० महिला ट्रॉफीच्या विजेत्याला पाचऐवजी ४० लाख रुपये मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणजी उपविजेत्याला तीन कोटी मिळतील

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, “बोर्डाच्या सर्व देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात येत असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. भारतीय क्रिकेटचा कणा असलेल्या देशांतर्गत स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच राहतील.” देशांतर्गत रणजी करंडक, इराणी, दुलीप करंडक, विजय हजारे करंडक, देवधर करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक, वरिष्ठ महिला वन डे करंडक, वरिष्ठ महिला टी२० करंडक या स्पर्धांचा समावेश आहे.

इराणी चषक विजेत्याला ५० लाख रुपये मिळतील

आतापर्यंत रणजी करंडक विजेत्याला दोन कोटी, उपविजेत्याला एक कोटी आणि उपांत्य फेरीतील विजेत्याला ५० लाख रुपये मिळत होते. आता विजेत्याला ५ कोटी रुपये, उपविजेत्याला तीन कोटी आणि उपांत्य फेरीतील स्पर्धकांना १ कोटी रुपये मिळतील. इराणी चषकाच्या विजेत्याला २५ ऐवजी ५० लाख तर उपविजेत्यालाही आता २५ लाख मिळणार आहेत.

महिला क्रिकेट स्पर्धांचा मोठा फायदा झाला

दुलीप करंडक विजेत्याला ४० लाखांऐवजी १ कोटी रुपये, तर उपविजेत्याला २० ऐवजी ५० लाख रुपये मिळतील. एकदिवसीय सामन्यांसाठी खेळलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या विजेत्याला ३० लाखांऐवजी एक कोटी, उपविजेत्याला १५ लाखांऐवजी ५० लाख मिळतील. प्रो. डीबी देवधर करंडक विजेत्याला २५ ऐवजी ४० लाख आणि उपविजेत्याला १५ ऐवजी २० लाख मिळतील.

हेही वाचा: IPL 2023, GTvsRR Score: रजवाड्यांची रॉयल्स कामगिरी! राजस्थानचा गुजरातवर तीन गडी राखून सनसनाटी विजय

सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीच्या विजेत्याला २५ ऐवजी ८० लाख रुपये आणि उपविजेत्याला १० ऐवजी ४० लाख रुपये मिळतील. वरिष्ठ महिला वनडे ट्रॉफीच्या विजेत्याला सहाऐवजी ५० लाख आणि उपविजेत्याला तीनऐवजी २५ लाख मिळतील. वरिष्ठ महिला टी२० ट्रॉफीच्या विजेत्याला ५ ऐवजी ४० लाख रुपये आणि उपविजेत्याला ३ ऐवजी २० लाख रुपये मिळतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci news jai shahs big announcement as ipl 2023 begins prize money doubles players get reward avw