भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याच्या वेळापत्रकावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आक्षेप घेतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने बीसीसीआयशी कोणतीही चर्चा न करताच वेळापत्रक जाहीर केले आहे, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
‘‘या दौऱ्याच्या वेळापत्रकाबाबत अद्याप काहीच ठरलेले नसून त्याबाबत बीसीसीआय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी चर्चा करणार आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले. भारतीय संघ या दौऱ्यात दोन ट्वेन्टी-२० सामने, सात एकदिवसीय सामने आणि त्यानंतर तीन कसोटी सामने खेळणार असून अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमधील आठ दिवसांच्या कालावधीवर बीसीसीआयचा आक्षेप आहे.
याविषयी बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया म्हणाले, ‘‘आम्ही त्याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला कळवले असून दोन्ही क्रिकेट मंडळांतर्फे यावर सामंजस्याने तोडगा काढला जाईल.’’ बीसीसीआयच्या नव्या कार्यकारिणीचा सामन्यांची संख्या आणि दौऱ्याच्या वेळापत्रकावर आक्षेप आहे. हा दौरा १९ जानेवारीला संपल्यानंतर लगेचच भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ‘‘सातऐवजी पाच एकदिवसीय सामने खेळल्यास, हा दौरा आठवडाआधी संपेल. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी आठवडाभराची विश्रांती मिळू शकेल. कसोटी सामन्यांआधी एकदिवसीय सामने खेळले तर चालेल का, याविषयी बीसीसीआय खेळाडूंशी चर्चा करणार आहे,’’ असे बीसीसीआयमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा