वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे अडचणीत सापडलेला भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला बीसीसीआयकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त केले आहे तसेच खेळाडूंबरोबर जे वार्षिक करार केले आहेत त्यामध्ये शमीचा ब गटात समावेश करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी शमीला बीसीसीआयकडून तीन कोटी रुपये मिळतील.
येत्या ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतही शमीचा दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. शमी दक्षिण आफ्रिकेवरुन परतताना दुबईमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले असा आरोप हसीन जहाँने केला होता. शमी मॅच फिक्सिंग करत असल्याचा आरोपही तिने केला होता.
शमीने ३० कसोटी सामन्यात ११० विकेट घेतल्या आहेत. ५० वनडेमध्ये ९१ विकेट आणि सात ट्वेंटी-२० सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि अन्य आरोप केल्यानंतर बीसीसीआयने शमीचा कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला नव्हता. मोहम्मद शमीवर झालेल्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांना मोहम्मद शमीविरोधातील आरोपांची चौकशी करण्याची विनंती केली होती. नीरज कुमार बीसीसीआय भ्रष्टाचार विरोधी युनिटचेही प्रमुख आहेत. बीसीसीआयने पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नीरज कुमार यांनी यासंबंधी एक गोपनीय अहवाल सीओएला सादर केला. त्या अहवालाच्या आधारावर बीसीसीआयने शमीचा ग्रेड बी मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला.