२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने भारतावर १८ धावांनी मात केली. अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला खरा….मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारतीय संघाच्या पराभवानंतर लगेचच धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु झाली आहे. धोनीने निवृत्ती कधी घ्यावी यावर आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आपलं मत दिलं आहे.

बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुलजी यांनी धोनीची संघाला अजुनही गरज असल्याचं म्हटलं आहे. “संपूर्ण स्पर्धेत धोनीने ज्या पद्धतीने खेळ केला आहे त्याची नक्कीच प्रशंसा करायला हवी. निवृत्ती कधी घ्यायची हा त्याचा खासगी प्रश्न आहे. आपलं शरीर आपल्याया कितपत साथ देतं आहे याचा निर्णय धोनीनेच घ्यायचा आहे. पण त्याच्यात अजुन खूप क्रिकेट बाकी आहे. संघातल्या तरुण सदस्यांना त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे.”

मात्र टीम इंडियाच्या पराभवाबद्दल एडुलजी आणि हंगामी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी दुःख व्यक्त केलं. “उपांत्य फेरीमधून बाहेर पडावं लागणं ही कोणत्याही संघासाठी दुर्दैवी बाब आहे. मात्र भारतीय संघाने न्यूझीलंडला चांगली झुंज दिली याचा आम्हाला अभिमान आहे. पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी ढकलला गेला, ज्यामुळे सर्व काही बिघडलं. पहिल्या ३ विकेट झटपट माघारी परतल्यामुळे संघ बॅकफूटवर ढकलला गेला.” एडुलजींनी संघाचं मनोधैर्य वाढवलं. याचसोबत हंगामी अध्यक्ष खन्ना यांनीही टीम इंडिया पुढील स्पर्धांमध्ये जोरदार कमबॅक करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला.

Story img Loader