भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) प्रशासकीय समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील व्यक्तीपुजेवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेवढा उदोउदो करत नसतील त्यापेक्षाही जास्त बीसीसीआय विराट कोहलीला पुजते, अशा शब्दांत गुहा यांनी बीसीसीआयच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभलेखातून त्यांनी हे विचार मांडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवर असतानाच्या चार महिन्यांच्या काळात विराट कोहलीचे बीसीसीआयमध्ये किती वर्चस्व आहे, हे मला कळले. केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांची मोदींवर जितकी भक्ती असेल त्याहून कितीतरी अधिक विराट कोहली बीसीसीआयसाठी पूजनीय आहे. प्रत्येक गोष्टीत बीसीसीआय विराट कोहलीसमोर झुकते. एखादा निर्णय कर्णधाराच्या अखत्यारित येत नसेल तरी बीसीसीआयकडून विराट कोहलीचे मत विचारले जाते. एखाद्या दौऱ्याची आखणी करायची असो किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीबाबतचा एखादा निर्णय असो प्रत्येकवेळी बीसीसीआयचे सीईओ विराटचे मत विचारा, असे सुचवतात. प्रत्येक गोष्टीत विराटचा शब्द अंतिम असतो. बीसीसीआयचे पदाधिकारी कोहलीला पहिल्या नावाने हाक मारत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील नात्याचे स्वरूप मालक आणि नोकरासारखेच आहे, अशी तिखट टीका गुहा यांनी केली आहे.

याशिवाय, त्यांनी कोहली आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची तुलना केली आहे. भारतातील परिस्थितीचा विचार केल्यास प्रत्येक क्षेत्रात वैयक्तिक चारित्र्य आणि कामगिरीचा उत्तम मिलाफ साधणाऱ्या व्यक्ती पुढे जाऊन खूप मोठ्या होतात. विराट कोहलीमध्ये हे सर्व गुण आहेत. याबाबतीत केवळ एकच व्यक्ती त्याच्या जवळपास जाऊ शकते, ती म्हणजे अनिल कुंबळे. कुंबळे हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. याशिवाय, त्याच्याकडे क्रिकेटची उत्कृष्ट समजही होती. तसेच तो सुशिक्षित आणि समाजकारणात सक्रिय होता. कुंबळे स्वत:चे महत्त्व जाणून होता आणि त्यानुसार त्याने प्रत्येक पाऊल टाकले. त्यामुळे उत्तम क्रिकेटपटू आणि वैयक्तिक चारित्र्य याबाबतीत कुंबळेच विराटच्या पंक्तीत बसणारा आहे. हीच गोष्ट दोघांमधील वादास कारणीभूत ठरली. याच कारणामुळे अनिल कुंबळेला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला, असे गुहा यांनी लेखात सांगितले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci officials worship virat kohli more than cabinet worships pm narendra modi ramachandra guha