भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामना (पिंक बॉल टेस्ट) आयोजित केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केला जाऊ शकतो. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्याच्या तयारीत आहे. कॅरेबियन संघ भारतात दाखल झाला आहे. ६ फेब्रुवारीपासून दोन्ही देशांदरम्यान पहिली एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील तीनही सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर कोलकातामध्ये दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे.
हेही वाचा – IPL 2022 : काय सांगता..! मेगा ऑक्शनमध्ये चक्क क्रीडामंत्र्यावर लागणार बोली; वाचा कोण आहे हा मंत्री?
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. सध्याच्या वेळापत्रकानुसार, कसोटी मालिका २५ मार्चपासून बंगळुरूमध्ये सुरू होईल आणि दुसरा कसोटी सामना मोहालीमध्ये खेळवला जाईल. त्याचवेळी, बीसीसीआय श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना आयोजित करण्याचा विचार करत आहे. भारताने प्रथम पिंक बॉल कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळला गहोता.
माध्यमांच्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला टी-२० मालिका आधी आयोजित करण्याची विनंती केली आहे. दव पडण्याची शक्यता असल्याने मोहालीत डे-नाईट कसोटी सामन्याचे आयोजन होण्याची शक्यता फारच कमी आहे.