बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया कालवश
क्रिकेट विश्वाला आर्थिक चणचणीतून बाहेर काढून आर्थिक महासत्ता बनवणारे, खेळाला पैसा, प्रसिद्धी, मान मिळवून देणारे, एकिकडे धुर्त राजकारणी अशी प्रतिमा असताना खेळ आणि खेळाडूंचा विकास करायचा हे ध्येय उराशी बाळगून सत्यात उतरवणारे, कधीही पुनरागमन करून प्रतिस्पध्र्याना चकित करणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले, ते ७५ वर्षांचे होते.
बुधवारी छातीत दुखत असल्याने त्यांना बी. एम. बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पण रविवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली होती. त्यांच्या जठरामध्ये सतत रक्तस्त्राव होत होता, त्याचबरोबर त्यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांचे कार्य बंद झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
कोलकात्यातील मारवाडी कुटुंबात जगमोहन यांचा जन्म झाला होता. महाविद्यालयातून क्रिकेट खेळताना ते यष्टीरक्षण करत असत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर एक द्विशतकही होते. १९७९ मध्ये दालमिया यांनी बीसीसीआयमध्ये प्रवेश केला आणि १९८३ मध्ये बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. भारतामध्ये १९८७ आणि १९९६ साली विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. १९९७ साली आयसीसीची धुरा सांभाळली, आशियामधून पहिले आयसीसीचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यावेळी आयसीसीकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी स्पर्धा भरवत त्यांनी आयसीसीला पैसे मिळवून दिले. भारतीय क्रिकेटची आर्थिक स्थिती डबगाईला आली असताना त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संघटनेला स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. सामन्यांचे दूरचित्रवाणीचे हक्क क्रिकेटला किती पैसा मिळवून देऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. शरद पवारांनी दालमिया यांचा पराभव करून बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवले. त्यानंतर बीसीसीआयने दालमिया यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप लावत त्यांना न्यायालयात खेचले. पण बीसीसीआयला न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध करता आले नाहीत.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटवर गडद ढग जमा झाल्यावर पुन्हा एकदा बीसीसीआयला त्यांची आठवण झाली. आर्थिक हितसंबंध जपल्यामुळे त्यावेळचे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पायउतार व्हावे लागले. त्यावेळी क्रिकेटची घडी बसवण्यासाठी दालमिया यांच्याकडे बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्षपद सोपवण्यात आले. क्रिकेटने गमावलेली विश्वासार्हता मिळवण्यात त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाले.
या वर्षी मार्च महिन्यात त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. पण त्यावेळी त्याची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. दालमिया हे फक्त नावापुरते अध्यक्षपद भूषवत होते आणि बीसीसीआयची अन्य मंडळी खासकरून सचिव अनुराग ठाकूर हे सारा कारभार पाहत होते. त्यांना विश्रांती देण्याचा सल्ला देऊन अध्यक्षपद बीसीसीआयमधील एका व्यक्तीला देण्याचा प्रयत्नही धुरीणांकडून सुरु होता. पण बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणूनच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
* १९७९ मध्ये दालमिया यांनी बीसीसीआयमध्ये प्रवेश केला आणि १९८३ मध्ये बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली
* बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंदरजीत सिंग बिंद्रा यांच्या सहकार्याने त्यांनी १९८७ व १९९६च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आणले
* १९९७ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
* २०००साली आयसीसीचे अध्यक्षपद सोडून बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान
* २००५मध्ये शरद पवारांकडून पराभव
* १९९६च्या विश्वचषक स्पध्रेत आर्थिक अफरातफरीच्या आरोपांच्या पाश्र्वभुमिवर त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला. न्यायालयाने निर्दोश मुक्तता केल्यानंतर पुन्हा सक्रिय
* २०१३ मध्ये तत्कालिन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना न्यायालयाने पदभार सोडायला सांगितल्यानंतर त्यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला.
* दहा वर्षांनंतर २०१५मध्ये त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली.
श्रद्धांजली
जगमोहन दालमियांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही
सहभागी आहोत.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
बीसीसीआयच्या सर्व सदस्यांच्या वतीने दालमिया यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्याजवळ दूरदृष्टी होती आणि त्यांनी भारतात क्रिकेटच्या विकासासाठी खूप कार्य केले आहे. जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटला स्थान मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
अनुराग ठाकूर, बीसीसीआय सचिव
जगमोहन दालमिया यांच्या कुटुंब आणि मित्र परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. जून महिन्यात मी त्यांची भेट घेतली होती आणि ती अखेरची ठरेल असे वाटलेही नव्हते. क्रिकेटसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.
– सचिन तेंडुलकर, माजी कसोटीपटू
दालमिया यांच्या निधनाने दु:ख झाले. भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचे योगदान अफाट होते.
– अनिल कुंबळे, माजी कसोटीपटू
दालमिया हे चतुर प्रशासक होते. क्रिकेटप्रती त्यांची तळमळ अतुलनीय होती.
– बिशनसिंग बेदी, माजी कसोटीपटू
भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान मोठे आहे. ते एक चाणाक्ष प्रशासक होते आणि त्यांच्याजवळ दूरदृष्टी होती. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे.
– व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, माजी कसोटीपटू
दालमिया यांच्या जाण्याच्या बातमीने खूप दु:ख झाले. मनातून क्रिकेपटू असलेल्या प्रशासकाला
भावपूर्ण श्रद्धांजली.
– संजय मांजरेकर, माजी कसोटीपटू
चतुर प्रशासकाला श्रद्धांजली. – आर. अश्विन, क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे. त्यांनी खेळाडूंना योग्य मार्ग दाखवण्याची भूमिका बजावली.
– सुरेश रैना, क्रिकेटपटू