IPL चा यंदाचा हंगाम काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ करोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे स्थगित करण्यात आला आहे. यानंतर करोनाचं देशात संकट सुरू असताना आयपीएल स्पर्धा का भरवण्यात आली? अशी टीका केली जाऊ लागली आहे. करोना वाढत असताना मुळातच आयपीएलचं आयोजन करायला नको होतं, अशी देखील प्रतिक्रिया उमटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर BCCI चा अध्यक्ष आणि भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आयपीएल स्पर्धेचं आयोजन करून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही”, असं स्पष्ट मत सौरव गांगुलीनं मांडलं आहे. तसेच, आयपीएलसाठी देशात आलेल्या परदेशी खेळाडूंची पूर्ण काळजी घेतली जात आहे, असं देखील सौरव गांगुलीनं सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपली भूमिका मांडली आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम स्थगित करण्यात आला असून ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच आयपीएलचं आयोजन, करोनाचा प्रादुर्भाव आणि खेळाडूंचं आरोग्य या मुद्द्यांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भातल्या सर्वच मुद्द्यांवर सौरव गांगुलीनं उत्तर दिलं आहे.

तेव्हा भारतात इतके रुग्ण नव्हते!

आयपीएलच्या आयोजनासंदर्भात बोलताना सौरव म्हणाला, “जेव्हा आम्ही आयपीएलचं आयोजन केलं, तेव्हा भारतात इतके रुग्ण नव्हते. आम्ही इंग्लंडचा दौरा देखील यशस्वीपणे केला. फेब्रुवारी महिन्यात भारतात फार कमी रुग्णसंख्या होती. गेल्या तीन आठवड्यांमध्येच ही रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. आम्ही आयपीएल गेल्या वर्षीप्रमाणे युएईमध्ये भरवण्याच्या पर्यायावर देखील विचार केला होता. पण शेवटी आम्ही भारतातच आयोजन केलं. रुग्णसंख्या कमी होती म्हणूनच आम्ही दोन शहरांऐवजी सहा शहरांमध्ये सामने भरवण्याचा निर्णय घेतला होता”, असं गांगुली म्हणाला.

‘‘लोक मरत होते आणि IPL सुरू होतं…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची टीका

परदेशी खेळाडू सुरक्षित आहेत!

दरम्यान, अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातल्यामुळे आयपीएलसाठी भारतात आलेल्या खेळाडूंचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, “सर्व परदेशी खेळाडू सुरक्षित असतील. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. ते सुरक्षितपणे घरी परततील. ऑस्ट्रेलियन खेळाडू उद्या मालदीवला पोहोचतील. तिथे १० दिवसांचा क्वारंटाईन काळ संपवून ते ऑस्ट्रेलियाला जातील”, असं गांगुलीनं स्पष्ट केलं.

IPLच्या स्थगितीनंतर कुटुंबासमवेत घरी पोहोचला विराट कोहली

आयपीएल पुन्हा कधी सुरू होणार?

सध्या स्थगित झालेला हंगाम पुन्हा कधी सुरू होईल याविषयी आत्ता काहीच सांगता येणार नसल्याचं गांगुली म्हणाला. शिवाय, हे सामने भारतात खेळवले जाणार की युएईमध्ये हे देखील आत्ताच सांगणं कठीण आहे, असं त्यानं सांगितलं.

बायो-बबल कुचकामी ठरलं?

काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे मोठा गाजावाजा केलेलं बायोबबल कुचकामी ठरल्याची टीका होऊ लागली आहे. यावर विचारलं असता गांगुली म्हणाला, “मला वाटत नाही की कुणी खेळाडूने बायो-बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं असेल. हे नक्की कसं झालं हे सांगता येणं कठीण आहे. जसं देशभरातले इतके नागरिक करोना पॉझिटिव्ह होत आहेत हे सांगता येणं कठीण आहे. इंग्लिश प्रिमियर लीग, मँचेस्टर सिटी, आर्सेनलचे खेळाडू देखील पॉझिटिव्ह झाले आहेत. सामने पुढे ढकलले गेले आहेत. परदेशातल्या स्पर्धांमध्ये देखील हे झालं आहे.”

IPL 2021: मुंबई इंडियन्सने जिंकलं मन! परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी

आता टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी-१० वर्ल्डकपचं काय?

दरम्यान, आयपीएल जरी स्थगित केलेली असली, तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी-२० वर्ल्डकप बाबत असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं गांगुली म्हणाला. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ जून ते २२ जून या नियोजित वेळेतच होणार आहे. त्यासाठी खेळाडूंच्या चाचण्या केल्या जातील. ते १० दिवसांचा क्वारंटाईन काळ देखील इंग्लंडमध्ये घालवतील. पण भारतात होणारा टी-१० वर्ल्डकप युएई किंवा अजून कुठे हलवण्याबाबत आत्ताच काही बोलणं घाईचं ठरेल”, असं गांगुलीनं स्पष्ट केलं.

Story img Loader