बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अलीकडेच कर्णधारपदावरील वक्तव्यावरून गांगुली आणि विराट कोहली यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गांगुली निवड समितीच्या बैठकींमध्ये सहभागी झाला होता. बोर्डाच्या घटनेनुसार गांगुलीला असे करता येत नाही. सोशल मीडियावरही चाहते गांगुलीला ट्रोल करत आहेत. अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. बोर्ड सध्या आयपीएलच्या मेगा लिलावाची तयारी करत आहे.
इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ”ही पूर्णपणे फसवी आणि खोटी बातमी आहे.” दुसरा अधिकारी म्हणाला, ”गांगुलीने अनेक प्रसंगी हे केले आहे. आजकाल बीसीसीआयमध्ये असेच चालू आहे. गांगुलीने निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कोणतेही औचित्य नाही. हे खूप दुर्दैवी आहे.”
याआधी एक अधिकारी निवड समितीच्या बैठकीला कोणतेही नियम न जुमानता उपस्थित राहत असल्याचे समोर आले होते. त्याच्यापुढे प्रशिक्षक आणि कर्णधार दोघेही असहाय्य होते. ते काहीच करू शकत नव्हते. बोर्डाच्या नियमानुसार बीसीसीआयचे सचिव बैठकीला उपस्थित राहू शकतात. पण संघ निवडीची संपूर्ण जबाबदारी निवड समिती अध्यक्षावर असते.
हेही वाचा – IND vs AUS U19 WC SEMIFINAL : भारताची पहिली बॅटिंग; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
गेल्या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत संघाचा नेता मानला विराट कोहली आता कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार नाही. आता संघ निवडीत निवड समिती अध्यक्ष, कर्णधार आणि प्रशिक्षक यांची भूमिका नगण्य असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली संघ निवडीत हस्तक्षेप करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. गांगुली निवड बैठकांना जातो आणि हे पूर्णपणे बीसीसीआयच्या घटनेच्या विरोधात आहे.