भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज विराट कोहली गेल्या काही काळापासून आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला अनेक माजी खेळाडूंच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, काही माजी खेळाडू आता विराटच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अगदी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षांनीसुद्धा विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने विराट कोहलीची बाजू सावरली आहे.
माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा ब्रिटिश संसदेत गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर गांगुलीने एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना गांगुलीने विराटची पाठराखण केली. तो म्हणाला, “विराट नक्की जोरदार पुनरागमन करेल. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती यश मिळवलेले आहे ते तुम्ही बघितले आहे. त्याच्या आकडेवारीकडे बघा. हे सर्व क्षमता आणि गुणवत्तेशिवाय घडलेले नाही. सध्या तो कठीण काळातून जात आहे. त्यालाही याची जाणीव आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे.”
गांगुली म्हणाला की, “खेळात असे प्रकार घडत असतात. हे सर्वांसोबत घडले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि माझ्यासोबतही असे झाले आहे. आता कोहलीच्या बाबतीतही हेच होत आहे. ते भविष्यातील खेळाडूंच्या बाबतीत होईल. मात्र, एक खेळाडू म्हणून विराटने फक्त त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यात व्यग्र आहे. मांडीच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात विराट कोहलीला खेळता आले नव्हते. कोहलीने २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही. एजबस्टन कसोटीत त्याने दोन डावात केवळ ३१ धावा केल्या होत्या. तर, टी २० मध्येही तो धावा करण्यात अयशस्वी झाला होता.