भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने क्रिकेटमध्ये ३० वर्षे पूर्ण केली आहेत. स्वत: सौरव गांगुलीने बुधवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तो आयुष्यामध्ये नवीन गोष्टीची सुरुवात करणार आहे. त्यासाठी चाहत्यांच्या समर्थनाची आवश्यकता, असे ट्विट त्याने केले आहे. त्याच्या या ट्विटमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? तो राजकारणात प्रवेश करणार का? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होते आहेत. याशिवाय, त्याला राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिन्यात सहा तारखेला गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची भेट घेतली होती. शाह यांनी गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी जाऊन रात्रीचे जेवण केले होते. दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (भाजपा) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर, आता गांगुलीने केलेल्या ट्विटमुळे पुन्हा या शक्यतांना हवा मिळाली आहे.

गांगुलीने ट्विट केले आहे की, ‘मी १९९२ मध्ये क्रिकेटपटू म्हणून माझी कारकिर्द सुरू केली होती. त्याला २०२२ मध्ये ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. मुख्य म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला. माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या, मला पाठिंबा देणाऱ्या आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. आज मी नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे. ज्याद्वारे मी मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करू शकेन. मला आशा आहे की माझ्या आयुष्याच्या नवीन अध्यायात तुम्ही मला मदत करत राहाल.”

सौरव गांगुलीच्या या ट्विटमधून काहीही स्पष्ट होत नाही. त्यामुळे तो नेमके काय करणार आहे, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एएनआयला याबाबत माहिती देऊन या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. जय शाह यांनी, एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही.