नवी दिल्ली : महिला इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पाच संघांचा लिलाव बुधवारी पार पडणार असून यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ४००० कोटी इतकी रक्कम अपेक्षित आहे.
महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वाचे यंदा आयोजन केले जाणार असून यातील पाच संघांच्या खरेदीसाठी आघाडीचे उद्योग समूह उत्सुक आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, प्रति संघामागे ५०० ते ६०० कोटी रुपयांची विजयी बोली लागण्याची शक्यता आहे. ‘‘महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा खूप मोठी आणि मौल्यवान ठरू शकते. प्रत्येक संघाच्या खरेदीसाठी किमान ५०० कोटी रुपयांची विजयी बोली लागू शकेल. ८०० कोटींहून अधिकची बोली लागण्याची शक्यता कमी आहे,’’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महिला ‘आयपीएल’मध्ये संघ खरेदीसाठी ३० हून अधिक कंपन्या व फ्रेंचायझींनी पाच लाख रुपये किमतीची निविदा कागदपत्रे घेतली आहेत. यात पुरुष ‘आयपीएल’मधील दहाही संघ, तसेच अदानी समूह, टोरेंट समूह, हलदीरामचे प्रभूजी, काप्री ग्लोबल आणि आदित्य बिर्ला समूह यांसारख्या आघाडीच्या समुहांचा समावेश आहे. यातील काही समुहांनी २०२१ मध्ये पुरुष ‘आयपीएल’चे नवे दोन संघ खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता.