BCCI Sacked Indian Cricket Team Coaching Staff Members: आयपीएल २०२५ दरम्यान भारताच्या क्रिकेट संघातून मोठी अपडेट समोर येत आहे. भारताच्या पुरूष क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमधील चार जणांना बीसीसीआयने राम राम ठोकल्याचे वृत्त रिपोर्ट्समधून समोर येत आहे. ऑस्ट्रेलियात या वर्षी संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधील बाहेर गेलेल्या गोष्टी लक्षात घेऊन बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचललं आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डाने गौतम गंभीरचा सर्वात जवळचा सहकारी आणि भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना पदावरून काढून टाकले आहे. अभिषेक नायरशिवाय भारताचे फिल्डिंग कोच टी दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांनाही पदावरून काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नियमांनुसार त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची भरती करण्यात येणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने आपल्या नावे केल्यानंतरही बीसीसीआयने अवघ्या ८ महिन्यांत अभिषेक नायरला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. रिपोर्ट्सच्या मते सध्या अभिषेक नायर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्या जागी दुसरा कोणताही प्रशिक्षक आणला जाणार नाही. कारण सितांशु कोटक हे संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर आधीच जोडले गेले आहेत. याबरोबर रायन टेन डेश्टे असिस्टन्ट कोच म्हणून संघाचा भाग आहेत आणि त्यांनाच फिल्डिंग कोचची जबाबदारी दिली जाऊ शकते.

टीम इंडियाचे ट्रेनर सोहम देसाईच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती होऊ शकते. एड्रियन ले रॉक्स त्याची जागा घेऊ शकतो. सध्या तो आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे. याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबरही काम केले आहे. बीसीसीआयने यापैकी कोणत्याही निर्णयाची अधिकृत घोषणा केलेली नाही, रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आलेली आहे.

सध्या, प्रशिक्षण सहाय्यक राघवेंद्र, दयानंद गरानी, ​​फिजिओथेरपिस्ट कमलेश जैन, अरुण कानडे, चेतन कुमार, राजीव कुमार, टीम ऑपरेशन्स मॅनेजर सुमित मल्लापूरकर, एक सुरक्षा व्यवस्थापक आणि इतर अनेक जण टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ म्हणून असतील.

आयपीएल २०२५ च्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कराराबद्दल सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाचे करार जाहीर करण्यात आले. पण पुरुष संघाचे करार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष क्रिकेट संघाच्या केंद्रीय करारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पण भारतीय संघ आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय केंद्रीय कराराची घोषणा करू शकते.