Shubman Gill hurt his right index finger : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणारा भारतीय संघ जखमी खेळाडूंमुळे त्रस्त आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नाहीत. विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटींमधून विश्रांती घेतली होती. हे तिन्ही खेळाडू पुढे उपलब्ध होतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे. हा खेळाडू आहे शुबमन गिल. तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.
विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही माहिती दिली. बीसीसीायने सांगितले की, बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शुबमन गिल चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करू शकणार नाही. बराच काळ खराब फॉर्मशी झगडणाऱ्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. फॉर्ममध्ये परतल्यानंतर त्याला दुखापत झाली आहे. दुखापत किती गंभीर आहे याची माहिती समोर आलेली नाही. दुखापत गंभीर होऊन तो पुढील कसोटीतून बाहेर पडला तर भारताच्या अडचणी वाढतील.
अकरा महिन्यानंतर शुबमनने झळकावले शतक –
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. मात्र शुबमन गिलने संयमाने फलंदाजी करत १३२ चेंडूत शतक झळकावले आणि भारताचा दुसरा डाव सावरला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. हे शुबमन गिलच्या कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक ठरले. शुबमनने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.
दुसऱ्या डावात भारतीय संघ २५५ धावांत गारद झाला. रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव रोखला. आता इंग्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांचे लक्ष्य आहे. या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक १०४ धावा केल्या. अक्षर पटेलने ४५ आणि रविचंद्रन अश्विनने २९ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार विकेट्स घेतल्या. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.
३९९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. तिसऱ्या दिवसअखेर सलामीला आलेल्या जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. दोघांची ही बहारदार भागीदारी अश्विनने ११व्या षटकात डकेटची विकेट घेऊन तोडली. डकेटने आक्रमक खेळ करत २७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या.