BCCI Secretary Saikia reacts to Virat Kohli complaint About Family Rule: बीसीसीआयचा खेळाडूंच्या विदेश दौऱ्यांकरता कुटुंबाबाबतचा नियम हा चर्चेचा विषय आहे. विराट कोहलीने आयपीएल २०२५ पूर्वी आरसीबीच्या एका कार्यक्रमात या नियमाबाबत मोठं वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर बीसीसीआय निर्णयात बदल करणार असे, रिपोर्ट्स समोर येत होते. पण आता बीसीसीआयचे सचिन देवजीत सैकिया यांनी उत्तर देत नियमात बदल होणार नसल्याचे सांगितले आहे.

भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) विदेश दौऱ्यांवर असलेल्या भारतीय खेळाडूंसाठीच्या सध्याच्या नियमांमध्ये बदल करणार नाही, असे सचिव देवजित सैकिया यांनी बुधवार, १९ मार्च रोजी सांगितले. विराट कोहलीने विदेश दौऱ्यांदरम्यान कुटुंबाबातच्या कठोर नियमाबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर सैकिया यांनी हे भाष्य केले आहे.

आयपीएलच्याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोहली म्हणाला होता की भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू जेव्हा विदेश दौऱ्यावर असतो तेव्हा त्यांचे कुटुंब त्यांच्याबरोबर असावे असे खेळाडूंना वाटतं. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर करण्यात आलेल्या बीसीसीआयच्या नियमांवरील प्रश्नावर कोहलीने प्रतिक्रिया दिली होती. कोहलीच्या या वक्तव्याला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही पाठिंबा दिला आहे.

विराट कोहलीच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयच्या नियमावर काय म्हणाले बीसीसीआय सचिव

बीसीसीआयच्या सचिवांनी कोहलीच्या विधानावर प्रतिक्रिया देत सांगितले की क्रिकेट बोर्ड येत्या काळात नियमांमध्ये कोणताही बदल करणार नाही. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ते जून ते जुलै दरम्यान ५ कसोटी सामने खेळतील.

“सध्या हा नियम कायम राहिल, कारण ते देशासाठी आणि आपल्या संस्थेसाठी बीसीसीआयसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” देवजित सैकिया यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढे सचिव म्हणाले, “बीसीसीआयला हे माहित आहे की या नियमामुळे काही जणांमध्ये नाराजी असू शकते किंवा वेगवेगळी मते असू शकतात, कारण लोकशाही व्यवस्थेत लोकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हा नियम सर्व संघ सदस्यांसाठी म्हणजेच खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, सहाय्यक कर्मचारी आणि सहभागी असलेल्या सर्वांना समान रीतीने लागू होतो आणि सर्वांचे हित लक्षात घेऊन हा नियम लागू केला आहे,” असे ते पुढे म्हणाले.

बीसीसीआयची कुटुंबाबाबत नवीन नियमावली काय आहेत?

४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासह जास्तीत जास्त १४ दिवस राहू शकतात.

४५ दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यांवर, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसह जास्तीत जास्त एक आठवडा राहू शकतात.

बीसीसीआयच्या सचिवांनी सांगितले की हे नियम भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून आहेत. विराट कोहली आणि रवी शास्त्री हे खेळाडू संघाचा भाग असण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना दौऱ्यावर जाण्याची परवानगी नव्हती हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जागतिक क्रिकेटमधील बदलत्या काळानुसार या नियमांमध्ये बदल केले आहेत. बीसीसीआयचे सचिव म्हणाले की, “हे नियम एका रात्रीत तयार केलेले नाही; ते अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत, आमचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या कारकिर्दीच्या काळापासून – आणि कदाचित त्यापूर्वीही,”

पुढे सैकिया म्हणाले, “नवीन नियम हे मागील नियमांमध्ये सुधारणा करून तयार केले आहेत, ज्यामध्ये खेळाडूंच्या सराव सत्रांमधील उपस्थिती, सामन्यांचे वेळापत्रक, दौरे, सामान, संघाच्या हालचाली आणि इतर गोष्टीही त्यात समाविष्ट आहे.” असे ते पुढे म्हणाले.