पीटीआय, मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुरुष संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध लवकरच सुरू करणार असून यासाठी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी अर्ज मागवले जाणार असल्याचे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला या पदावर कायम राहायचे असल्यास त्याला नव्याने अर्ज करावा लागणार असल्याचेही शहांनी स्पष्ट केले.
द्रविडसोबत ‘बीसीसीआय’ने प्रथम दोन वर्षांचा करार केला होता. त्याचा हा करार गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संपुष्टात आला. मात्र, द्रविडसह सर्व साहाय्यक प्रशिक्षकांचा करार पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत वाढविण्यात आला होता. आता ‘बीसीसीआय’कडून नव्या प्रशिक्षकाचा शोध घेतला जाणार असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल, अशी माहिती शहांकडून देण्यात आली.
‘‘आम्ही भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी येत्या काही दिवसांत नव्याने अर्ज मागवणार आहोत. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे. त्यांना प्रशिक्षकपदी कायम राहायचे असल्याने पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. नव्या प्रशिक्षकांची निवड ही तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल,’’ असे शहा यांनी सांगितले.
हेही वाचा >>>GT vs CSK : गिल-सुदर्शनच्या शतकांसह गुजरातचा चेन्नईवर विजय; प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर
तसेच मर्यादित षटकांचे संघ आणि कसोटी संघासाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमण्याचा भारतीय क्रिकेटचा इतिहास नाही. त्यामुळे या वेळीही क्रिकेटच्या सर्व प्रारूपांसाठी एकच प्रशिक्षक नेमला जाण्याची शक्यता असली, तरी अंतिम निर्णय क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) असेल, असे शहा म्हणाले. ‘सीएसी’मध्ये जतिन परांजपे, अशोक मल्होत्रा आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे.
‘‘भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळय़ा प्रारूपांसाठी वेगवेगळे प्रशिक्षक निवडल्याचे यापूर्वी घडलेले नाही. तसेच आपले बरेचसे खेळाडू हे क्रिकेटच्या तीनही (कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०) प्रारूपांत खेळतात. यात ऋषभ पंत, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, प्रशिक्षकांबाबतचा अंतिम निर्णय हा क्रिकेट सल्लागार समितीकडून घेतला जाईल. त्यांच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही,’’ असे शहा यांनी नमूद केले. तसेच ‘सीएसी’ने परदेशी प्रशिक्षक नेमण्याची शिफारस केली, तर आम्ही त्यानुसारच निवड करू असेही शहा यांनी स्पष्ट केले.
विश्वचषकासाठी अनुभवी संघ
अमेरिकेतील खेळपट्टय़ा आणि परिस्थिती याबाबत फारशी माहिती नसल्याने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. ‘‘विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही अनुभवी खेळाडूंची निवड केली आहे. आम्ही सर्वोत्तम १५ खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. हे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत यशस्वी कामगिरी करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. भारतीय खेळाडू दोन तुकडय़ांमध्ये अमेरिकेला रवाना होतील. ज्या खेळाडूंचे ‘आयपीएल’ संघ बाद फेरी गाठणार नाहीत ते २४ मे रोजी निघतील. उर्वरित खेळाडूंना ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यानंतर अमेरिकेत पाठवले जाईल,’’ असे शहा म्हणाले.
प्रभावी खेळाडूच्या नियमाबाबत पुनर्विचार शक्य
‘आयपीएल’मधील प्रभावी खेळाडूच्या (इम्पॅक्ट प्लेयर) नियमाबाबत क्रिकेट वर्तुळात मतमतांतरे आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने या नियमावर टीका केली होती. या नियमामुळे भारतीय अष्टपैलूंच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. मात्र, प्रभावी खेळाडूचा नियम हा प्रयोगिक तत्त्वावर असून याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे जय शहा यांनी सांगितले. या नियमामुळे प्रत्येक सामन्यात दोन अतिरिक्त भारतीय खेळाडूंना संधी मिळत आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु खेळाडू या नियमाच्या विरोधात असतील तर आम्ही नक्कीच पुनर्विचार करू. विश्वचषकानंतर खेळाडू, फ्रेंचायझी आणि प्रसारणकर्त्यांशी चर्चा करून आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे शहा म्हणाले.
वार्षिक कराराबाबतचे निर्णय आगरकरांच्या सांगण्यावरून..
‘बीसीसीआय’च्या वार्षिक करारातून इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वगळण्याचा निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या सांगण्यावरून घेण्यात आला, असे जय शहा यांनी सांगितले. ‘बीसीसीआय’च्या सूचनेनंतरही या दोघांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्यास टाळाटाळ केली होती. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर किशनने दीर्घकाळ विश्रांती घेतली. त्यानंतर तो ‘आयपीएल’मध्ये सहभागी झाला. दुसरीकडे, श्रेयस रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून खेळला. परंतु त्यापूर्वीच्या काही सामन्यांत तंदुरुस्त असूनही त्याने खेळणे टाळले होते. त्याच वेळी तो कोलकाता नाइट रायडर्सच्या सराव शिबिरात सहभागी झाला होता. ‘‘तुम्ही ‘बीसीसीआय’चे संविधान बघू शकता. निवड समितीच्या बैठकीचा मी केवळ संयोजक आहे. संघनिवड आणि वार्षिक करारात कोणत्या खेळाडूंची निवड करायची याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीच्या अध्यक्षांकडे असतो. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट न खेळलेल्या या दोन खेळाडूंना (किशन आणि श्रेयस) वार्षिक कराराच्या यादीतून वगळण्याचा निर्णय आगरकर यांचाच होता. ते जे सांगतील, त्याची अंमलबजावणी करणे हे माझे काम आहे,’’ असे शहा म्हणाले.