BCCI Secretary Jay Shah statement on Mayank Yadav : टीम इंडिया १९ सप्टेंबर पासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये टी-२० मालिकेत खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. येथे कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे पाहणे बाकी आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना मयंक यादवला टी-२० मालिकेत संधी मिळेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जय शहा यांनी काय प्रतिक्रिया दिली? याबद्दल जाणून घेऊया.
२१ वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने ३० मार्च रोजी लखनऊ सुपरजायंट्सकडून आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला होता. पदार्पणाच्याच सामन्यात त्याने आपल्या वेगवान माऱ्याने सर्वांना थक्क केले होते. मयंकने ताशी १५५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली. तो सतत त्याच वेगाने चेंडू टाकत राहिला. मयंक हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला ज्याने त्याच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकला. मात्र, यानंतर त्याला आपली लय कायम राखता आली नाही. त्याची सर्वोत्तम कामगिरी ही १४ धावांत ३ विकेट्स आहे.
जय शाह मयंक यादवबद्दल काय म्हणाले?
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “मी सध्या मयंक यादवबद्दल तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. तो संघात असेल की नाही याची शाश्वती नाही. पण हो, तो खरोखरच चांगला गोलंदाज आहे. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. तो सध्या एनसीएमध्ये आहे.” मयंकने आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना चार सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या.
मयंक यादवची आतापर्यंतची कारकीर्द –
मयंकच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने लिस्ट ए चे १७ सामने खेळले आहेत. या कालावधीत ३४ विकेट्स घेतल्या आहेत. मयंकची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ही ४७ धावांत 4 विकेट्स आहे. मयंकने एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. त्याने १४ टी-२० सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत. जर मयंकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला लवकरच टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते.