भारताने २०२१३ सालातील विश्वचषकात संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. सलग १० विजयामुळे यावेळी भारतच विश्वचषकावर आपले नाव कोरणार असे समस्त क्रिकेटप्रेमींना वाटत होते. मात्र या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दुर्दैवाने भारताचा पराभव झाला. दरम्यान, या पराभवामुळे रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का? त्याला कर्णधारपदापासून दूर केले जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. यावरच आता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे.
जय शाह नेमकं काय म्हणाले?
रोहित शर्माच २०२४ साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा कर्णधार असेल असे स्पष्ट संकेत, जय शाह यांनी दिले आहेत. राजकोटमधील एका कार्यक्रमात बोलताना जय शाह यांनी आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीवर भाष्य केले. यावेळी बोलताना, “२०२३ सालच्या अहमदाबाद येथील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपण सलग १० सामन्यांत विजय मिळवला. मात्र आपण तो विश्वचषक जिंकू शकलो नाही. पराभव झाला असला तरी आपण सर्वांचीच मनं जिंकली. मी तुम्हाला आश्वासन देतो की, २०२४ सालच्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोस येते आपण भारताचा झेंडा नक्की फडकवू,” असे जय शाह म्हणाले.
एकदिवसीय विश्वचषकात नेमकं काय घडलं होतं?
एकदीवसीय विश्वचषक स्पर्धेत २०२३ भारताने सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरी गेली होती. भारताने सलग दहा सामन्यांत विजय मिळवत प्रतिस्पर्धींना धूळ चारली होती. अंतिम सामन्यात भारताचा समाना ऑस्ट्रेलियाशी होता. या सामन्यात मात्र दुर्दैवाने भारताला पराभव पत्करावा लागला. या समान्यात भारताने सुरुवातीला फलंदाजी करत ४० षटकांत २४० धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्माने ४७ धावा केल्या होत्या. तर विरोट कोहली आणि के. एल. राहुल यांनी अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऑस्ट्रेलियन संघाने ४३ षटकांत ही भारताने उभारलेली धावसंख्या गाठत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार टी-२० विश्वचषक
दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्मा आणि धडाडीचा फलंदाज विराट कोहली यांचा भारतीय संघात समावेश केला जाणार की त्यांना विश्रांती दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जय शाह यांच्या या विधानानंतर रोहित शर्मा भारतीय संघात असेल तसेच त्याच्याकडे पूर्ण संघाचे नेतृत्व असेल हे स्पष्ट झाले आहे. आगामी टी-२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित केला जाणार आहे. त्याची तयारी आता भारतीय संघाने सुरू केली आहे.