Jay Shah awarded legendary actor Rajinikanth with a golden ticket: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. बीसीसीआय भारतातील दिग्गज स्टार्सना गोल्डन तिकीट देत आहे. बीसीसीआयने अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट दिले होते. आता या यादीत सुपरस्टार रजनीकांतचेही नाव जोडले गेले आहे. मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अभिनेता रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक बीसीसीआयने एक्स (ट्विटर) वर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये जय शाह रजनीकांत यांना गोल्डन तिकीट देताना दिसत आहे. बोर्डाने फोटोसोबत कॅप्शन लिहिले की, “माननीय बीसीसीआय सचिव जय शाह यांनी श्री रजनीकांत यांना गोल्डन तिकीट देऊन त्यांचा सन्मान केला. या दिग्गज अभिनेत्याने लाखो हृदयांच्या ठोक्यांवर अमिट छाप सोडली आहे.”

बीसीसीआयने सर्वात अगोदर बॉलिवूडचे महान अभिनेते अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट दिले होते. यानंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही गोल्डन तिकीट देऊन गौरविण्यात आले आहे. बीसीसीआय हे गोल्डन तिकीट अधिक दिग्गजांना भेट देऊ शकते. काही दिवसापूर्वी माजी भारती कर्णधार सुनील गावसकर यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीला गोल्डन तिकीट देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा – IND vs SL: ‘त्या सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक…’; भारत-श्रीलंका सामन्यांवर आरोप करणाऱ्यांना सुनील गावसकरांचा टोला

स्पोर्टस्टारसाठीच्या त्यांच्या स्तंभात, गावसकर यांनी आपले विचार व्यक्त करताना लिहले होते, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे हा एक चांगला निर्णय आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी गोल्डन तिकिटे मिळाली आहेत.”

सुनील गावसकर पुढे म्हणाले होते की, “यादीतील अतिरिक्त लोकांची संख्या अज्ञात आहे. तथापि, यामध्ये इस्रोच्या संचालकांचा समावेश अपेक्षित आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली. त्या शहरांमध्ये होणार्‍या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी संघटनांना त्यांच्या संबंधित शहरांतील भारतीय खेळाडूंना आमंत्रित करण्याचे निर्देश दिले तर एक उल्लेखनीय उपक्रम ठरेल. अर्थात, दोन विश्वचषक चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव हे आणखी दोन खेळाडू गोल्डन तिकिटांसाठी पात्र आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci secretary jay shah awarded legendary actor rajinikanth with a golden ticket for the icc world cup on tuesday vbm