भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी टीम इंडिया वेळेवर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार असल्याची पुष्टी केली आहे. जय शाह यांनी आज शनिवारी सांगितले, या दौऱ्यात भारत ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेत ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळवले जाणार होते, मात्र आता त्यांची तारीख नंतर ठरवली जाईल.

शाह यांनी एएनआयला सांगितले, ”बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला (सीएसए) पुष्टी केली आहे, की भारतीय संघ सध्या ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांसाठी दौरा करणार आहे. उर्वरित ४ टी-२० सामने खेळवले जाणार नाहीत, त्यांच्या तारखाही नंतर जाहीर केल्या जातील.”

हेही वाचा – रोहित-विराटमध्ये दमदार कॅप्टन कोण? गौतम गंभीरनं दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाला, ‘‘तो कधीही मॅच हातातून निसटू देत नाही”

बीसीसीआयला सुरुवातीपासून टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करायचा नव्हता. ओमिक्रॉन या करोनाच्या नवीन प्रकारामुळे हा दौरा छोटा करावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय खेळाडूंना कठोर क्वारंटाइनमधून जावे लागण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १७ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यानंतर सेंच्युरियनमध्ये दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होईल आणि तिसरा कसोटी सामना पुढील वर्षी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होईल. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना ११ जानेवारीला, दुसरा एकदिवसीय सामना १४ जानेवारीला आणि तिसरा एकदिवसीय सामना १६ जानेवारीला खेळवला जाईल.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. याचा धोका पाहता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शंका उपस्थित केली जात होती. दक्षिण आफ्रिकेच्या गोटेंग प्रांतात या विषाणूशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आली आहेत. एवढेच नाही, तर मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात दाखल आहेत. या प्रांतात भारताला २ कसोटी सामने खेळायचे आहेत. नेदरलँड संघाने अलीकडेच सेंच्युरियन येथे पहिला सामना खेळल्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांचा दौरा छोटा केला होता. युरोपियन युनियनच्या अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रवासी निर्बंध लादले आहेत. भारत अ संघ मात्र त्यांच्या तीन सामन्यांसाठी ब्लोमफॉन्टेनमध्ये थांबला आहे. मालिकेतील दुसरी कसोटी शुक्रवारी संपली आणि तिसरी अनधिकृत कसोटी सोमवारपासून सुरू होणार आहे.

Story img Loader