Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्याची मर्सिडीज कार जळून खाक झाली आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतवर देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय ) सचिव जय शाह यांनी ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
जय शाह ट्वीट करत म्हणाले की, “माझी प्रार्थना ऋषभ पंतच्या पाठिशी आहे. ऋषभच्या कुटुंबीयांशी आणि रुग्णालयातील डॉक्टरांशी माझं बोलणं झालं आहे. ऋषभची प्रकृती स्थिर असून, त्याच्या शरीराची तपासणी करण्यात येत आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. त्याला शक्य ती सर्व मदत करण्यात येईल,” असं जय शाह यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा – Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत आणि सायरस मिस्त्रींच्या अपघातामधील विचित्र साम्य
कुठं घडला अपघात?
ऋषभ पंत हा दिल्लीहून उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. तेव्हा पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ १०८ ला फोन करत ऋषभला रुग्णालयात दाखल केलं. अपघातावेळी कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता.
ऋषभ पंतने सांगितल्यानुसार, “गाडी चालवताना झोप लागली आणि कार दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारच्या समोरील काच फोडून बाहेर पडलो,” अशी माहिती पंतने दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेज समोर
ऋषभ पंतच्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताची भीषणता जाणवत आहे. सीसीटीव्हीत रस्ता पूर्ण मोकळा दिसत असून, पंतची कार अत्यंत वेगाने येत असल्याची दिसत आहे. ऋषभची कार दुभाजक तोडून पलीकडे जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.