Asia Cup 2023 IND vs PAK: यंदा आशिया चषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया २०२३ मध्ये पाकिस्तानी संघाला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवणार का अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु होती. जसे की आपण जाणता आशिया चषक २०२३ च्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. राजकीय वादामुळे व या दोन्ही देशाच्या संबंधांमुळे जर आशिया चषक पाकिस्तानात झाला तर टीम इंडियाचा सहभाग असणार का असाही प्रश्न सर्वांना पडत आहे. २००८ नंतर टीम इंडिया मागील १४ वर्ष पाकिस्तानात मॅच खेळलेली नाही. या सर्व चर्चांवर बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी आता स्पष्ट उत्तर दिले आहे.
जय शाह यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आशिया चषक २०२३ साठी एखादे तिसरे (तटस्थ) ठिकाण ठरवण्यात येणार आहे. टीम इंडियाने सामन्यासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्याचा अधिकार सर्वस्वी सरकारकडे आहे मात्र आशिया चषकासाठी अन्य ठिकाण ठरवले जाणार हा निर्णय निश्चित आहे.
आशिया चषकासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का?
दरम्यान, मागील वर्षीच आशिया चषकासाठी पाकिस्तानला यजमानपद देण्यात आले होते, मात्र बीसीसीआय यासाठी तयार नसल्याने आशिया चषक युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. २०२३ मध्ये मात्र आशिया चषक पाकिस्तानात होणार आहे तर त्या पुढील वर्षी भारताला यजमानपद मिळणार आहे. भारत पाक राजकीय संबंधांमुळे हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट वगळता अन्य कोणतेही सामने एकत्र खेळत नाहीत. आयपीएलमध्ये सुद्धा पाकिस्तानी संघातील खेळाडूंना आमंत्रण दिले जात नाही.