नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंग्लिश लायन्स आणि डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी यांच्यामध्ये झालेल्या सामन्याविषयी कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट निमायक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) याबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे. इंग्लिश लायन्स संघाने भारतात सराव करताना योग्य तत्त्वे न पाळल्याबद्दल बीसीसीआयने एका पत्राद्वारे इंग्लंड क्रिकेट मंडळाकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे. ‘‘याप्रकरणी बीसीसीआयने आमच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आम्ही ते डी. वाय. पाटील अकादमीचे प्रमुख विजय पाटील यांच्याकडे पाठवले होते. त्यावर विजय पाटील यांनी दिलेले प्रत्युत्तर आम्ही बीसीसीआयकडे सुपूर्द केले आहे. योग्य तत्त्वे पाळली गेली नाहीत, याला बीसीसीआयचा आक्षेप आहे,’’ असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट मंडळाकडूनही (ईसीबी) स्पष्टीकरण मागवले असून, ईसीबीने याप्रकरणी बीसीसीआयची माफी मागितली की नाही, हे मात्र समजू शकले नाही.
इंग्लंडच्या कसोटी संघातील स्टीव्हन फिन आणि जो रूट हे खेळाडू या सामन्यात खेळले होते आणि ईसीबीने आपल्या या खेळाडूंसाठी कडक सुरक्षाव्यवस्थेची मागणी केली होती. त्यामुळे ईसीबीने योग्य तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.   

Story img Loader