नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्माची जागा घेण्यासाठी जसप्रीत बुमराचे नाव आघाडीवर राहणार यात शंका नसली, तरी निवड समितीला या पदासाठी दिर्घकालीन सेवा देणारा पर्याय हवा असल्याचे समोर येत आहे. नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत निवड समिती संभ्रमात पडली असून, कर्णधार निवडताना तेवढाच सक्षम उपकर्णधार असायला हवा असा दुसरा विचारदेखील केला जात आहे.

रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेट खेळणार नाही हे निवड समितीच्या बाजूने निश्चित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्णधारपदासाठी तातडीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे. मात्र, गोलंदाज म्हणून त्याच्यावर पडणारा ताण, तंदुरुस्ती आणि नव्याने उद्भवलेली पाठदुखी यामुळे निवड समिती बुमराकडे कायम स्वरूपी कर्णधार म्हणून बघण्याचे धाडस करण्यास तयार नाही.

चॅम्पियन्स करंडकासाठी रोहित अजूनही कर्णधाराच्या भूमिकेत दिसू शकतो. पण, कसोटीसाठी निवड समिती आतापासून पर्यायाच्या शोधात आहे. भारतीय संघ आता थेट इंग्लंडविरुद्धच कसोटी क्रिकेट खेळणार असल्याने त्या वेळी बुमरा कर्णधार होऊ शकेल. पण, तेव्हा निवड समिती उपकर्णधारपदासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधात राहील. जेणेकरून त्याच्याकडे भविष्यातला कर्णधार म्हणून बघितले जाऊ शकते. कसोटी क्रिकेट संघात सध्या तरी यासाठी ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल हीच नावे समोर येत आहेत.

हेही वाचा >>> सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी

निवड समिती, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यासह शुक्रवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आढावा बैठकीत बुमराच्या कंबरेच्या दुखापतीची चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर बैठकीनंतर रोहित इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात असण्याची शक्यती कमी असल्याचा निष्कर्ष निघत आहे. अशा वेळी बुमराच्या तंदुरुस्तीबाबत सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास तो हेडिंग्ले कसोटीत निश्चित भारतीय संघाचे नेतृत्व करेल. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बुमरा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला आहे.

बुमरा प्राधान्याने वेगवान गोलंदाज म्हणून काम करत असल्यामुळे तो दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकेल का? असा प्रश्न निवड समितीला पडला आहे. त्यामुळे निवड समिती याबाबत दुसरे नियोजन तयार ठेवू शकते. यामध्ये कर्णधाराइतकाच सक्षम उपकर्णधाराची निवड करता येईल. यासाठी पंतचे नाव आघाडीवर आहे. तो तरुण असून, त्याच्यासमोर मोठी कारकीर्द शिल्लक आहे. सामना जिंकून देण्याची क्षमता पंतकडे आहे आणि म्हणून तो उपकर्णधार असावा असे मत माजी निवड समिती सदस्य देवांग गांधी याने मांडले आहे.

भारताचा माजी यष्टिरक्षक दीपदास गुप्ता यानेही तंदुरुस्तीच्या कारणामुळे बुमरा दीर्घकालीन कर्णधारपदाचा पर्याय असू शकत नाही असे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय व्यग्र कार्यक्रम, द्विपक्षीय मालिका दरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी’च्या स्पर्धांसाठी बुमराची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्यावर गोलंदाजीचा ताण पडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आयपीएल’चा दोन महिन्यांचा हंगाम विसरता येणार नाही, असे मतही दीप दासगुप्ताने मांडले आहे.

त्यामुळेच कर्णधारापेक्षा मजबूत उपकर्णधार असावा आणि त्यासाठी पंतच योग्य आहे, असा मतप्रवाह पुढे आला आहे. जैस्वाल सध्या फलंदाजीची धुरा सांभाळत आहे आणि त्याची कारकीर्द आता कुठे सुरू होत असल्यामुळे इतक्या लवकर त्याच्याकडे ही जबाबदारी देऊ नये, असे माजी खेळाडूंचे मत आहे.

Story img Loader