महिला प्रीमियर लीग (WPL 2023) साठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (१३ फेब्रुवारी) मुंबईत होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी अडीच वाजता लिलाव सुरू होईल. यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत बीसीसीआयने एका महिला लिलावकर्त्याची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने मुंबईच्या मलिका अडवाणीची या जबाबदारीसाठी निवड केली आहे.
बीसीसीआयच्या आयपीएल लिलावात तीन जणांनी लिलाव करणाऱ्यांची भूमिका बजावली आहे. लिलावात प्रथम रिचर्ड मॅडलीचा आवाज घुमला. त्यांच्यानंतर ह्यू अॅडम्स यांना ही जबाबदारी मिळाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिलावादरम्यान ते स्टेजवरून अचानक खाली कोसळले होते. त्यांच्या जागी चारू शर्माने लिलावाची प्रक्रिया सुरु ठेवली. त्यानंतर एडमंड्स शेवटी परत आले आणि दोघांनी लिलाव पार पडला.
कोण आहे मलिका अडवाणी?
मलिका अडवाणी ही मुंबईची रहिवासी आहे. ती मुंबईस्थित आर्ट कलेक्टर सल्लागार आणि आर्ट इंडिया कन्सल्टंट्स या फर्ममध्ये भागीदार म्हणून काम करते. बीसीसीआयने आयोजित केलेल्या लिलावाची ही पहिलीच वेळ असेल ज्याची जबाबदारी एक महिला सांभाळणार आहे.
फ्रँचायझींना योजना आखण्याची मिळणार संधी –
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, यूपी वॉरियर्स असे पाच संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना सांगितले आहे की, लिलावादरम्यान प्रत्येक सेट संपल्यानंतर फ्रँचायझींना त्यांच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी थोडा वेळ दिला जाईल. हा वेळ किती काळ असेल हे लिलावकर्ता सांगेल. प्रत्येक विश्रांतीनंतर, लिलाव सुरू होण्याच्या दोन मिनिटे आधी एक चेतावणी घंटा वाजवली जाईल. त्यानंतर पुन्हा लिलाव सुरू होईल. प्रत्येक तासानंतर १० मिनिटांचा ब्रेक दिला जाईल.
हेही वाचा – ILT20 Final: गल्फ जायंट्स बनले पहिले आयएल टी-२० चॅम्पियन; फायनल सामन्यात डेझर्ट वायपर्सचा केला पराभव
४०९ खेळाडूंची लिलावासाठी निवड –
महिला प्रीमियर लीग स्पर्धेला ४ मार्च पासून सुरुवात होणार आहे. २२ सामन्यांची ही स्पर्धा ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान नवी मुंबईतील स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये डीवाय पाटील स्टेडियम आणि मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमचा समावेश आहे. लिलावात एकूण ४०९ खेळाडू सहभागी आहेत. लिलावासाठी १५२५ महिला क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली.