इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी दोन नव्या संघांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुनर्लिलाव घेण्याच्या विचारात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांऐवजी दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे.

पारंपरिक लिलाव न झाल्यास पुनर्लिलाव होऊ शकतो. कारण आयपीएल प्रक्षेपण वाहिनी आणि प्रायोजकांबरोबर बीसीसीआयचा २०१७पर्यंत करार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया नव्याने सुरू होईल आणि सर्व खेळाडूंचा नव्याने लिलाव होईल. त्यामुळे दोन नव्या संघांना केवळ दोनच वर्षे मिळणार आहेत. यामुळे सगळ्यात कमी रकमेचे आवेदनपत्र सादर करणारा गुंतवणूकदार नव्या संघाचा मालक होऊ शकतो. बीसीसीआयने नव्या संघांसाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केल्यास ४० किंवा ३० कोटी किंवा त्याहीपेक्षा कमी रकमेला संघाची मालकी मिळू शकते.
चेन्नई, राजस्थान संघांसह अन्य काही खेळाडूंचा लिलाव करून नव्या संघांना खेळाडू उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर बीसीसीआय विचार करत आहे. ९ नोव्हेंबरला बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे.

Story img Loader