मंगळवारी (२ ऑगस्ट) भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. ४४ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी करणारा सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आपल्या खेळातून सूर्यकुमारने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. मात्र, तो तिथेच थांबला नाही. सामना संपल्यानंतर त्याने मैदानाच्या कुंपनाबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांची भेट घेतली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार कुंपनाच्यापलीकडे उभ्या असलेल्या चाहत्यांना भेटताना दिसला. त्याने भारतीय आणि वेस्ट इंडीज क्रिकेट चाहत्यांना ऑटोग्राफ दिले. काही चाहत्यांसोबत त्याने फोटोदेखील काढले. त्याच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

सूर्यकुमार यादव त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘मी काही विशेष केले नाही. फक्त खेळाचा आनंद घेतला.’

हेही वाचा – Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसिम जाफरची सोशल मीडियावर धूम; मीम्सवर चाहते खुश

सूर्यकुमार यादवने केवळ २० टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु, त्याची कामगिरी इतकी उत्कृष्ट आहे की तो पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबर आझमच्या अगदी जवळ पोहचला आहे. बाबर आझम फक्त दोन रेटिंग गुणांनी पुढे आहे. सूर्यकुमारला वेस्ट इंडीजविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यात त्याने चांगली कामगिरी केली तर बाबर आझमची जागा घेऊ शकतो.

Story img Loader