BCCI shared a video of Team India playing footvolley: विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया रविवारी नेदरलँडशी भिडणार आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असेल. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर नेदरलँडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्यासाठी संघर्ष करत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेवटच्या लीग सामन्यापूर्वी बंगळुरूमध्ये फूटवॉलीचा आनंद लुटला. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय खेळाडूंनी फूटवॉली खेळली. खेळाडूंनी जाळीऐवजी खुर्च्यांचा वापर केला.
बीसीसीआयने शेअर केले व्हिडीओ –
भारतीय खेळाडूंनी दोन संघ आपापसात विभागले. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शार्दुल ठाकूर आणि शुबमन गिल एकाच संघात दिसले. तसेच दुसऱ्या संघात सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, प्रसिध कृष्णा आणि इतर काही कर्मचारी होते. यावेळी खेळाडूंमध्ये चेष्टा-मस्करी पाहायला मिळाली. या दरम्यान सिराजन खुर्ची उचलून शुबमन गिलला मारण्यासाठी धावताना दिसला. भारतीय क्रिकेट संघाने त्यांचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
फुटवॉली म्हणजे काय?
फुटवॉली हा खेळ फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचा मिलाफ आहे. ब्राझीलपासून हा खेळ जगभर पसरला. फुटवॉली हे बीच व्हॉलीबॉल आणि फुटबॉलचे संयोजन आहे. यामध्ये व्हॉलीबॉलप्रमाणे हातांऐवजी पाय आणि शरीराचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर चेंडू खाली पडला नाही पाहिजे. गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंमध्ये फुटवॉलीची क्रेझ वाढली आहे.
उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होऊ शकतो –
सर्व आठ सामने जिंकून भारतीय संघ १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल. आतापर्यंतच्या समीकरणानुसार न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर राहणार हे निश्चित मानले जात आहे. म्हणजेच १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार हे निश्चित आहे. दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.