Team India Coaching Staff Trekking Video: भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे. मात्र, सध्या भारतीय संघ धरमशालामध्ये असून तेथील थंडीचा आनंद घेत आहे. धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. यानंतर प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी ट्रेकिंगचा आनंद लुटला, तर भारतीय खेळाडूंनी विश्रांती घेतली. बीसीसीआयने कोचिंग स्टाफचा ट्रेकिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप दिसत आहेत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहिले, ‘संघातील खेळाडूंसाठी एक दिवस सुट्टी आली. मात्र, सपोर्ट स्टाफने टेकड्यांमध्ये दिवस चांगला घालवला. आमचं धर्मशालेतलं काम पूर्ण झालं. लखनऊ येथे होणाऱ्या सामन्यासाठी काही सकारात्मक भावनांसह पुढे जात आहोत.’ व्हिडीओमध्ये भारतीय कोचिंग स्टाफने ट्रायंड ट्रेकचा आनंद घेतला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले- येथील दृश्य अतिशय प्रेक्षणीय आहे. डोंगरावर चढणे अवघड आहे. ट्रायंड ट्रेक खूप आव्हानात्मक आहे.
काय म्हणाले राहुल द्रविड?
द्रविड म्हणाले, मी येथील दृश्याच्या प्रेमात पडलो आहे. आमचा दिवस खूप छान होता. आम्ही आमच्या खेळाडूंना इथे आणू शकलो नाही. कारण गिर्यारोहण करताना दगडांवर पाऊल ठेवणे धोकादायक ठरू शकते. मात्र, जेव्हा खेळाडू खेळत नसतात आणि त्यांना विश्रांती दिली जाते, तेव्हा मला त्यांना येथे आणावेसे वाटते. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, जे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहेत. येथील वैविध्य पाहण्यासारखे आहे. आमच्या पुढच्या पिढीने ही ठिकाणे शोधून त्यांना भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे. माझ्या मुलांनी अशा ठिकाणांना भेट देऊन आनंद घ्यावा असे मला वाटते.
त्याचवेळी विक्रम राठोड म्हणाले, आम्ही ट्रेकची सुरुवात मॅक्लॉडगंजच्या ग्लू नावाच्या भागातून केली. शेवटचा ट्रेक म्हणजे ट्रेकिंगचा शेवटचा अर्धा तास खूप आव्हानात्मक असतो. पण माथ्यावर पोहोचताच हा नजारा तुमचा सगळा थकवा दूर करतो. विश्वचषक २०२३ बद्दल बोलायचे, तर भारतीय संघ विजय रथावर स्वार झाला आहे. त्यांनी आतापर्यंतचे त्यांचे पाचही सामने जिंकले आहेत पॉइंट टेबलमध्ये सध्या भारत हा अव्वल संघ आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून अव्वल स्थान पटकावले. त्यांचे पाच सामन्यांतून पाच विजयांसह १० गुण आहेत. भारताचा नेट रन रेट +१.३५३ आहे.