Cheteshwar Pujara meeting Team India ahead of third ODI against Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. हा सामना राजकोटमध्ये होत आहे. या सामन्यादरम्यान असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा राजकोटला पोहोचला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. पुजारा अचानक मैदानावर आला कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडला. यानंतर कॅमेराही पुजाराकडे वळला. पुजाराला मैदानावर अचानक पाहिल्यावर चाहत्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला.
पुजाराला पाहून सर्व खेळाडू झाले आश्चर्यचकित –
पुजाराला अचानक मैदानावर पाहून सर्व भारतीय खेळाडू पुजाराला भेटायला आले. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविडने पुजाराशी हस्तांदोलन केले, त्यानंतर अश्विनही पुजाराला भेटायला आला आणि त्याला मिठी मारली. यावेळी विराट कोहली मैदानावर सराव करत होता, जेव्हा त्याने पुजाराला पाहिले तेव्हा कोहलीही पुजाराला भेटायला आला आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनीही पुजाराची भेट घेतली. पुजाराला पाहून सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले.
भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य –
सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कांगारूंनी ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. मिचेल मार्शने ८४ चेंडूंत १३ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने ५६, स्टीव्ह स्मिथने ७४ आणि मार्नस लाबुशेनने ७२ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने १० षटकांत ८१ धावा दिल्या. तसेच कुलदीप यादवने २, सिराज आणि कृष्णाने १ विकेट घेतली.
रोहित-कोहली क्रीजवर उपस्थित –
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने सुरु केला आहे. भारताने १७ षटकांनंतर एक विकेट गमावून १०६ धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार रोहित शर्मा ४५ चेंडूत ६३ धावा, तर विराट कोहली २४ धावांवर फलंदाजी करत आहे. भारताला आता ३३ षटकांत २४७ धावांची गरज आहे. तत्पूर्वी सलामीला आलेला वॉशिंग्टन सुंदर ३० चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. त्याला ग्लेन मॅक्सवेलने झेलबाद केले.