नवी दिल्ली : परदेशातील लीगमध्ये खेळण्याचा अनुभव फायदेशीर ठरतो हे यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपले धोरण बदलून युवा क्रिकेटपटूंना विविध देशांमधील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी देणे आवश्यक आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केले.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यशस्वी प्रयोगानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आदी देशांमध्येही ट्वेन्टी-२० लीग सुरू करण्यात आल्या. या स्पर्धामध्ये विविध देशांतील आघाडीचे खेळाडू सहभागी होत असले तरी, भारतीय क्रिकेटपटूंना या स्पर्धामध्ये खेळण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून परवानगी दिली जात नाही. मात्र, आता या धोरणात बदल गरजेचा आहे, असे कुंबळेला वाटते.

‘‘विविध लीगमध्ये खेळण्याचा अनुभव खेळाडूंसाठी नक्कीच फायदेशीर ठरतो. ‘आयपीएल’मुळे भारतीय क्रिकेटच्या प्रगतीला कशा प्रकारे चालना मिळाली आणि सकारात्मक बदल घडले हे आपण पाहिले आहे. ‘आयपीएल’मध्ये विविध देशांतील आघाडीचे खेळाडू सहभागी होतात. त्यांच्यासोबत खेळण्याची आपल्या देशातील युवा खेळाडूंना संधी मिळते. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटूंना अन्य देशांतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभवही लाभदायी ठरू शकतो. त्यांना परदेशातील लीगमधून विचारणा होत असेल, तर परवानगी देण्यास काय हरकत आहे?’’ असा प्रश्न कुंबळेने उपस्थित केला.

Story img Loader