गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेट संघाने एकापाठोपाठ एक केलेले दौरे पाहता बीसीसीआयने स्वत:चे विमान खरेदी करायला हवे, असे मत माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केले. प्रवासासाठी स्वत:चे विमान असल्यास भारतीय खेळाडूंचा बरासचा वेळ वाचेल आणि त्यांना विश्रांती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरूवातीला भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये गेला होता. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि नुकताच पार पडलेला श्रीलंकेचा दौरा अशा भरगच्च वेळापत्रकामुळे भारतीय संघातील खेळाडूंना थोडीही उसंत मिळाली नव्हती. भारतीय संघाने हे तिन्ही दौरे अवघ्या सहा महिन्यांमध्ये केले आहेत.
भारतीय क्रिकेटचा ईशान्योदय!, सहा राज्यांचा रणजीमध्ये समावेश
या दरम्यान अनेक खेळाडूंना विश्रांतीही द्यावी लागली होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कपिल देव यांनी बीसीसीआयला विमान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वीही कपिल देव यांनी बीसीसीआयला काही सूचना केल्या होत्या. मात्र, यावेळचा त्यांचा सल्ला काहीसा उपरोधिक असल्याचे दिसत आहे. अशाप्रकारे अविरत खेळत राहिल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे. याचा गंभीर परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंचा विचार करायला हवा, असे बहुधा कपिला देव यांना सुचवायचे आहे. भारतीय संघासाठी बीसीसीआय लवकरच विमान खरेदी करेल, याचा मला विश्वास आहे. विमान खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी बीसीसीआयकडे पुरेसे पैसेही आहेत. याशिवाय, बीसीसीआयचे उत्पन्न पाहता ते विमानाच्या पार्किंगचा खर्चही उचलू शकतील. त्यामुळे खेळाडूंच्या वेळेची मोठी बचत होईल. किंबहुना बीसीसीआयने हा निर्णय पाच वर्षांपूर्वीच घ्यायला पाहिजे होता, असेही कपिल देव यांनी सांगितले. आता बीसीसीआय कपिल देव यांच्या या सल्ल्यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.