भारतात क्रिकेटचे पीक बारमाही बहरत असते, पण भारतात क्रिकेट चालवणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) क्रिकेटमध्येच दुजाभाव करताना दिसते. एकीकडे बीसीसीआयच्या अर्थकारणात मोलाची भर घालणाऱ्या आयपीएलला डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू असल्याचा क्रिकेटरसिकांना ठावठिकाणाही लागू दिला जात नाही. कारण बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धापेक्षा नेहमीच आयपीएलला अतिमहत्त्व दिलेले आहे. पण बीसीसीआयने ही आपली अप्पलपोटी भूमिका बदलली तर देशांतर्गत स्पर्धेलाही सुगीचे दिवस येतील आणि प्रेक्षक मोठय़ा संख्येने याकडे वळतील, याचा फायदा स्थानिक खेळाडूंनाही होईल.
बीसीसीआयने फक्त औपचारिकता म्हणून मुश्ताक अली स्पर्धेकडे न पाहता आपला दृष्टिकोन बदलला तर नक्कीच देशांतर्गत ट्वेन्टी-२० स्पर्धाही मोठे व्यासपीठ ठरू शकते, असे मत ‘चर्चेच्या मैदानातून’ या व्यासपीठावर मान्यवरांनी मांडले.
बीसीसीआय नक्कीच आयपीएलएवढे महत्त्व सध्या मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेला देत नाही. पूर्वी स्पर्धाचे वेळापत्रक पाहिले जायचे आणि त्यानुसार अन्य स्पर्धाचे आयोजन केले जायचे. या वेळी जेव्हा मुश्ताक अलीची विभागीय साखळी स्पर्धा सुरू होती, तेव्हा बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक सुरू होता. चाहते नक्कीच ट्वेन्टी-२० विश्वचषकालाच अधिक प्रधान्य देणार, हे कोणीही सांगू शकेल. बीसीसीआय ही स्पर्धा घेण्याची फक्त औपचारिकता पूर्ण करत आहे. त्याचबरोबर खेळाडूंचीही मुश्ताक अली खेळण्यापेक्षा आयपीएल खेळायला अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने हेदेखील पाहायला मिळाले. आयपीएल हा मोठा आर्थिक स्रोत आहे, तो गमावून चालणार नाही. ज्या वेळी दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स लीग चालू होती, तेव्हा भारतातील दुलीप करंडकाला खेळाडूच उपलब्ध नव्हते. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएललाच स्थानिक स्पर्धापुढे अधिक महत्त्व दिल्याचे नेहमीच दिसून आले आहे.
सुलक्षण कुलकर्णी, मुंबईचे माजी प्रशिक्षक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बऱ्याच स्पर्धा भरवत असते, ज्यामध्ये स्थानिक गुणवत्तेला न्याय मिळत असतो, त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत असते. ज्यामध्ये रणजी करंडक, विजय हजारे करंडक, सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० करंडक यासारख्या स्पर्धा असतात. पण या स्पर्धाना आयपीएलइतके वलय कधीही मिळालेले पाहिले नाही. आयपीएलसाठी बीसीसीआय जेवढी मेहनत घेते, जेवढी प्रसिद्धी करते, तेवढी अन्य स्थानिक स्पर्धाची होताना देत नाही. माझ्या मते आयपीएलएवढीच प्रसिद्धी देशांतील सर्व स्पर्धाना मिळालायलाच हवी. फक्त आम्ही बोलून काहीही होणार नाही. याबाबत प्रसारमाध्यमांनी गंभीर भूमिका घेत बीसीसीआयचे डोळे उघडायला हवेत. बीसीसीआयने याबाबत नक्कीच चिंतन करायला हवे. आयपीएलएवढी अन्य स्थानिक स्पर्धानाही प्रसिद्धी मिळाल्यास भारतातील गुणावन खेळाडूंना नक्कीच याची मदत होईल.
बिशन सिंग बेदी,भारताचे माजी क्रिकेटपटू
बीसीसीआय जेवढे आयपीएलला प्राधान्य देते, तेवढे प्राधान्य सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सोडाच, पण अन्य स्थानिक स्पर्धानाही देत नाही. रणजी, दुलीप, देवधर या स्पर्धा फार पूर्वापारपासून सुरू आहेत. पण या स्पर्धाना आतापर्यंत बीसीसीआयने कधीच आयपीएलएवढे प्राधान्य किंवा प्रसिद्धी दिलेली नाही. बीसीसीआयला आयपीएल, एकदिवसीय सामने आणि आयसीसीच्या स्पर्धा यांच्यामध्येच मश्गुल व्हायला आवडते. गुणवत्तेला वाव देणाऱ्या कसोटी क्रिकेटकडेही बीसीसीआय लक्ष देताना दिसत नाही. बीसीसीआयने आपला दृष्टिकोन बदलायला हवा, जर तो तसाच कायम राहिला, तर काही वर्षांनी स्थानिक स्पर्धा आणि स्थानिक खेळाडूंवर याचे परिणाम दिसून येतील. सध्याच्या घडीला लोकांना काय पाहिजे, हे बीसीसीआय चांगलेच जाणून आहे. स्थानिक स्पर्धा बीसीसीआय फक्त औपचारिकता म्हणूनच भरवत असल्याचे दिसून येत आहे. याचा गांभीर्याने विचार केला, तर नक्कीच स्थानिक क्रिकेटला अधिक चांगले दिवस येतील.
अजित वाडेकर, भारताचे माजी कर्णधार