Anil Kumble says Indian team’s coaching is slightly different : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे गौतम गंभीरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. त्याच्या मते केकेआर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर राहुल द्रविडची जागा घेण्यास आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून यश मिळविण्यास नक्कीच सक्षम आहे. वास्तविक, बीसीसीआयने जाहीर केले आहे की, राहुल द्रविडचा कार्यकाळ २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. बीसीसीआयनेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. यासाठी अर्ज मागविण्यात आले होते, ज्याची अंतिम तारीख २७ मे निश्चित करण्यात आली होती.

बीसीसीआयने गौतम गंभीरला वेळ द्यावा –

सध्या टीम इंडियाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकासाठी गंभीरचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्याने या पदासाठी अर्ज केला आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, कुंबळेने माजी सलामीवीराचे समर्थन करत बीसीसीआयकडे त्याला वेळ देण्याची मागणी केली आहे. अनिल कुंबळे म्हणाले, “तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तो नक्कीच सक्षम आहे. आम्ही गंभीरला संघ हाताळताना पाहिले आहे. त्याने भारताचे आणि फ्रँचायझी संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे वेगवेवगळ्या भूमिका पार पाडण्याची सर्व पात्रता आहे. पण भारतीय संघाचे प्रशिक्षकाची भूमिका थोडी वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला सेटल होण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मी म्हटल्याप्रमाणे, जर त्याने हे स्थान स्वीकारले, तर त्याला केवळ सध्याच्या संघाकडेच नाही तर भारतीय क्रिकेटच्या भविष्याकडेही पाहावे लागेल.

मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गंभीरचे काय मत?

अलीकडेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो ३.५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. या माजी सलामीवीराने सांगितले की, मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल.

हेही वाचा – IND vs CAN : टी-२० विश्वचषकातील विराटच्या फॉर्मवर शिवम दुबेचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “तो पुढील तीन सामन्यात…”

गौतम गंभीर म्हणाला, “आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही १४० कोटी भारतीयांचे आणि जगभरातील त्याहूनही अधिक भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा यापेक्षा मोठे काहीही कसे असू शकते?भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणारा मी नाही तर १४० कोटी भारतीय आहेत, जे टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो तर भारत विश्वचषक जिंकेल.”