भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे २६/११ मुंबई हल्यापासून पासून सलोख्याचे नाहीत त्यामुळे भारताने २००८ नंतर पाकिस्तानचा एकही दौरा केला नाही. यातच आता आगामी आशिया चषक २०२३ पाकिस्तानात होणार असल्याचं समोर आल्यानंतर टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या घोषणेनंतर पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी यावर भाष्य करत जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानचे माजी सलामीवीर फलंदाज सईद अनवर यांनी जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. अनवरच्या मते जर इतर संघ आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी तयार असतील, तर भारतीय संघालाच काय अडचण आहे. त्यांनी यावेळी बीसीसीआय आणि जय शाह यांच्यावर स्पष्ट शब्दात निशाणा साधला आहे. जय शाहांच्या मते आगामी आशिया चषक त्रयस्त ठिकाणी खेळवला गेला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर अनवरने देखील पुढच्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक अशाच प्रकारे त्रयस्त ठिकाणावर खेळला गेला पाहिजे, जो भारतात खेळला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याविषयी आयसीसीशी चर्चा केली पाहिजे, असेही अनवर म्हणाले.
पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज शाहीद आफ्रिदीने जय शाह यांच्यावर खूप मोठा आरोप करत म्हटलं आहे की. प्रशासकीय कारभार जय शाह यांना कळत नाही. त्याने ट्विट करताना असे म्हटले की, “मागील एक वर्षात दोन देशांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यांमुळे दोन्ही देशांत चांगले संबंघ निर्माण होत होते, पण जय शाह यांच्या वक्तव्याने परिस्थिती अवघड झाली आहे.
बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करताच पाकिस्तानच्या माजी यष्टीरक्षक कामरान अकमलने जय शाहांवर नाराजी व्यक्त केली आहे. एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, क्रिकेटमध्ये राजकारण न आणता दोन्ही देशांनी एकमेकांच्या धरतीवर क्रिकेट खेळायला हवे. अलीकडेच पाकिस्तानात वेगवेगळे आंतरराष्ट्रीय संघ येऊन गेले आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तान काय क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही पण पुढील पिढीचे खूप मोठे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयच्या निर्णयावर अकमलने म्हटले की, “टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही तर आम्ही क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही, पण यामुळे येणाऱ्या पिढीचे नुकसान होईल. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारखे संघ पाकिस्तानात खेळले आहेत. यासाठी पीसीबीसह येथील सुरक्षा व्यवस्थेने खूप मोठी मेहनत घेतली असून कुठलाही प्रकारचा त्यांना त्रास झाला नाही. आयसीसी आणि आशियाई संघटनेला पीसीबीने प्रत्युत्तर द्यायला हवं, ज्याचे अध्यक्ष जय शाह आहेत. जय शाह यांनी राजकारण करू नये ते भारतातच करावे, क्रिकेटमध्ये आणू नये”.