संपूर्ण जगाला ढवळून काढणाऱ्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेल्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावत दणका दिला. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्यामुळे वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत आणि फिरकीपटू अंकित चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा धाडसी निर्णय बीसीसीआयने घेतला. राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अमित सिंगला पाच वर्षांची तर सिद्धार्थ त्रिवेदीला एका वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे.
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख रवी सवानी यांनी सादर केलेल्या स्पॉट-फिक्सिंगच्या अहवालावर शुक्रवारी शिस्तपालन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘‘नोंदवलेली साक्ष आणि खेळाडूंच्या वैयक्तिक सुनावणीनंतर शिस्तपालन समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अमित सिंगवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआय आणि त्याच्या संलग्न असोसिएशन्सशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी त्याचा संबंध असणार नाही. सिद्धार्थ त्रिवेदीलाही एक वर्षभर क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. अंकित चव्हाण आणि एस. श्रीशांत यांच्यावर आजीवन बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे,’’ असे बीसीसीआयच्या पत्रकात म्हटले आहे.
सक्षम पुरावे न मिळाल्यामुळे युवा फिरकीपटू हरमीत सिंगला दिलासा मिळाला आहे. २०१२मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य असलेल्या हरमीत सिंगविरोधात कोणतीही कारवाई बीसीसीआयने केलेली नाही. ‘‘सबळ पुराव्यांअभावी हरमीत सिंगची मुक्तता करण्यात आली आहे,’’ असेही बीसीसीआयने सांगितले. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अजित चंडिलाबाबतीत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्याच्याविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. चंडिला सध्या जामीनावर सुटला असला तरी रवी सवानी यांनी त्याची भेट घेतलेली नाही. शिक्षा सुनावण्याआधी चंडिलाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेल्या श्रीशांत आणि अंकितला आजीवन बंदीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी शिफारस सवानी यांनी अहवालात केली होती. त्यामुळे श्रीशांत, अंकितवर आजीवन बंदी अपेक्षितच होती. ‘‘शिस्तपालन समितीतील सर्व सदस्य सहकार्य करणारे आहेत. मी त्यांना माझी बाजू समजावून सांगितली आहे. क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी लहानपणापासूनच उराशी बाळगले होते. त्यामुळे मी क्रिकेटला धोका देऊ शकत नाही. बीसीसीआय आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास असून मी नक्कीच निर्दोष सुटेन,’’ असे श्रीशांतने बैठकीला हजर राहण्याआधी सांगितले होते.
एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सवानी यांच्या अहवालावर बरीच चर्चा करण्यात आली. पैशांच्या मोबदल्यात एका षटकात ठरावीक धावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या श्रीशांत, चंडिला आणि अंकितला सवानी यांनी दोषी ठरवले होते. त्रिवेदी आणि हरमीत सिंग यांना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपातून सवानी यांनी मुक्त केले होते. मात्र सट्टेबाजांनी संपर्क साधल्याचे बीसीसीआयला न कळवल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले. ‘‘तमाम चाहत्यांचा क्रिकेटवरील विश्वास उडू नये, यासाठी बीसीसीआयने कठोर पावले उचलत क्रिकेटला धोका देणाऱ्या कोणत्याही खेळाडूची हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. मी केलेल्या शिफारशी शिस्तपालन समितीने मान्य केल्या,’’ असे सवानी यांनी सांगितले. अमित सिंग शिस्तपालन समितीसमोर हजर राहू शकला नाही. एका खराब आंब्यामुळे पेटीतील सर्व आंबे खराब होतात, अशी उपमा सवानी यांनी अमितला दिली.
बीसीसीआयकडून अंकित व हरमितची कानउघडणी
नवी दिल्ली : अंकित चव्हाण व हरमित सिंग या युवा क्रिकेटपटूंची बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या वरिष्ठ सदस्यांनी कानउघडणी केली. शिस्तपालन समितीत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन, वरिष्ठ उपाध्यक्ष निरंजन शहा, दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अरुण जेटली यांचा समावेश होता. या समितीने खेळाडूंना स्पॉट-फिक्सिंगचे परिणाम काय होऊ शकतात, आपल्या कृत्याचे कारकिर्दीवर काय परिणाम होतील, तुमच्यावर बंदी घातली गेली तर तुमच्या कुटुबीयांना समाजात काय समस्या भेडसावतील, आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. हरमित हा कनिष्ठ गटातील खेळाडू असल्यामुळे त्याच्यावरील कारवाईबाबत मवाळ धोरण स्वीकारण्यात आल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हरमीतची या प्रकरणी मुक्तता करण्यात आली.
श्रीशांतच्या कारकिर्दीवर एक नजर
रणजी करंडक स्पर्धेत केरळ संघातर्फे हॅट्ट्रिक घेत श्रीशांतने क्रिकेटजगताचे लक्ष वेधून घेतले. चॅलेंजर चषक स्पर्धेत शानदार प्रदर्शनाने श्रीशांतला राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाच्या पहिल्या कसोटी विजयात श्रीशांतच्या गोलंदाजीची भूमिका निर्णायक होती. मात्र विकेट्स घेण्याच्या क्षमतेपेक्षा त्याचे स्वैर वर्तन चर्चेत राहिले. द. आफ्रिकेच्या आंद्रे नेलला उद्देशून केलेले हातवारे असोत किंवा हरभजनने त्याला लगावलेली थप्पड असो, श्रीशांत सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने एका गुणी मात्र बेताल खेळाडूच्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला.
अंकितच्या कारकिर्दीची झलक
मुंबईच्या संघात वर्णी लागणं हेच खडतर आव्हान असते. मात्र प्रभावी डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी याच्या जोरावर उंचपुऱ्या अंकितने मुंबई संघात धडक मारली. नैसर्गिक कौशल्याला मेहनतीची, सातत्याची जोड देत तो संघाचा महत्त्वाचा घटकही झाला. आयपीएलच्या निमित्ताने राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्सतर्फे खेळण्याची संधी त्याला मिळाली. मात्र कुसंगतीने अंकितच्या क्रिकेट कारकिर्दीचा बळी घेतला आहे.
शिक्षेचा स्पॉट!
संपूर्ण जगाला ढवळून काढणाऱ्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात सहभागी असलेल्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-09-2013 at 05:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci slaps life ban on sreesanth chavan harmeet singh excused