भारतीय क्रिकेट संघातील कर्णधारपदावरुन सध्या चर्चा रंगली असून विराट कोहलीने केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत जाहीरपणे केलेल्या काही खुलाशांमुळे बीसीसीआयवर टीकेचा भडीमार होत आहे. विराट कोहलीने आपल्याशी टी-२० चं कर्णधारपद सोडू नये यासाठी कोणाचाही फोन आला नव्हता सांगत सौरव गांगुलीचा दावाही खोडून काढला आहे. यामुळे विराट विरुद्ध गांगुली असं चित्र उभं राहिलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहोत असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र सौरव गांगुलीने त्याने विराट कोहली क्रिकेटमधील वेगवेगळ्या लोकांसोबत सतत भांडत असतो असं सांगत नाराजीदेखील जाहीर केली आहे. सौरव गांगुलीने आपण स्वत: विराट कोहलीला फोन करुन टी-२० चं कर्णधारपद सोडू नये यासाठी विनंती केली होती असं सांगितलं होतं. मात्र विराटने आपल्याशी कोणीही संपर्क साधला नव्हता सांगत अनेक प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.

Explained: विराट, रोहित, बीसीसीआय नी कर्णधारपद; काय आहे नेमका वाद?

दरम्यान गुडगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात सौरव गांगुलीला कोणत्या खेळाडूची वृत्ती सर्वात जास्त आवडते असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सौरव गांगुलीने विराटचं नाव घेतलं. त्याने म्हटलं की, “आपल्याला विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो”.

कार्यक्रमात सौरव गांगुलीला आयुष्यात येणाऱ्या तणावाला हाताळायचं याबद्दलही विचारण्यात आलं. यावेळी गांगुलीने उपहासात्मक उत्तर दिलं. “आयुष्यात तणाव नसतोच. फक्त बायको आणि प्रेयसी तणाव देते”.

विराटचे ‘टीकास्वयंवर’; ‘टी-२० नेतृत्वत्यागाबाबत विचारणाच नाही’;  सौरव आणि बीसीसीआय यांच्यातील विसंवाद उघड

दरम्यान सौरव गांगुलीने याआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “मला यावर काहीच बोलायचं नाही. आम्ही हे हाताळत असून बीसीसीआयवर सोडून द्या,” असं गांगुलीने सांगितलं होतं.

गांगुलीने काय म्हटलं होतं –

कोहलीने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडून भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वपदही काढून मुंबईकर रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. विशेष म्हणजे या मुद्द्यावर, ‘विराटला टी-२० कर्णधारपद सोडण्याविषयी फेरविचार करण्याची विनंती केली होती. पण त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे आणि मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत म्हणून रोहितला कर्णधार केले’ असे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केले होते. त्याच्याशी पूर्ण विसंगत विराटचे बुधवारचे विधान ठरले.

विराट कोहलीने काय सांगितलं –

“‘टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नये यासाठी माझ्यासोबत कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. आफ्रिका दौऱ्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. ‘बीसीसीआय’ने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. कसोटी संघाबाबत संवाद झाल्यावर बैठक संपण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना निवड समितीच्या अध्यक्षांनी मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असं विराटने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci sourav ganguly indian cricketer virat kohlis attitude odi captains fighting nature sgy